Breaking News

कला जोपासा, किर्तीवंत व्हाल -लोकनेते रामशेठ ठाकूर

अभिनय प्रशिक्षण शिबिराचा समारोप

पनवेल ः रामप्रहर वृत्त
नृत्य, गायन, अभिनय अशा विविध कलांपैकी कोणतीही कला जर जोपासली, तर तुम्ही नक्की किर्तीवंत व्हाल. कलेमध्ये यश मिळावयचे असेल तर त्या दृष्टीने प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 30) केले.
पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आठ दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आले होते. या शिबिराच्या समारोप समारंभात लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते. या वेळी त्यांनी सर्व रंगकर्मी, प्रशिक्षणार्थींना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देऊन कला क्षेत्र जोपासण्यासाठी ठाकूर परिवार पनवेलकरांच्या सदैव सोबत राहील, अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमास अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, बाल रंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्ष तथा नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष तथा महापालिकेेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अभिनेते प्रकाश राणे, मनपा उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, मंगला माळवे, सचिव अक्षय कदम, प्रशिक्षक अशोक केंद्रे (मुंबई), रवि धुताडमल (बीड), मनोज चिताडे (वर्धा) आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना पनवेल कार्यक्षेत्रात उत्तमोत्तम कलाकार बनावेत अशा शुभेच्छा देऊन यासाठी महापालिका व पनवेल नाट्य परिषद शाखेने अभिनय शिबिर घेतल्याबद्दल अभिनंदन केले. भविष्यात नक्कीच या अभिनय शिबिराचा सर्व प्रशिक्षणार्थीना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भरपूर फायदा होईल, असे सांगून या निमित्ताने महापालिका सांस्कृतिक चळवळ उभी करून नवीन पायंडा पाडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. दीपा क्षीरसागर यांनी सांगितले की, हल्ली सर्वजण ताण-ताणवाचे जीवन जगत आहे. शरीराचा ताण कमी करण्यासाठी व्यायाम केला जातो, पण मनावरचा ताण कमी करण्यासाठी कलाच उपयोगी पडते. यासाठी मुलांना गायन, नृत्य, अभिनय अशा विविध कलांचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. पनवेल मनपा व नाट्य परिषद असे उपक्रम घेत घेत असल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.
माजी सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले, या अभिनय शिबिराच्या माध्यमातून महापालिका जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे. जनतेसाबत जाऊन सर्वाशी पालक या नात्याने जवळ जात आहे. मराठी नाट्यसंस्कृती रूजावी, संस्कृती बहरावी यासाठी महापालिका प्रयत्न करत असल्याने आनंद होत आहे. त्यांनी सर्व शिबिरार्थिंना ‘नाट्यशास्त्राची ओळख’ हे पुस्तक भेट दिले तसेच या शिबिराप्रमाणे लवकरच खारघर परिसरातही अशा प्रकारच्या अभिनय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभिनय प्रशिक्षणाच्या माध्यमातून पनवेलमध्ये महापालिका बालकांमध्ये नाट्यगुण रूजविण्यासाठी अशा उत्तम प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करते हे विशेष असल्याचे अभिनेते प्रकाश राणे यांनी सांगून भविष्यात मोठे रंगकर्मी होण्याचा आशीर्वाद मुलांना दिला.
या वेळी सर्व रंगकर्मीयांमार्फत लोकनेते रामशेठ ठाकूर यांना त्यांच्या 2 जूनला साजरा होणार्‍या वाढदिवसासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. समारोप कार्यक्रमात आठ दिवस अभिनय प्रशिक्षण घेतलेल्या सिनिअर आणि ज्युनिअर गटातील प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षकांच्या वतीने अभिनेते अशोक केंद्रे यांनी पनवेलमध्ये उत्तम कलावंत असल्याचे सांगितले. उपस्थित प्रशिक्षणार्थींनीही आपल्या मनोगतामध्ये अभिनय शिबिर घेतल्याबद्दल महापालिका आणि नाट्य परिषदेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाट्य परिषद पनवेल शाखेचे कार्यवाह शामनाथ पुंडे यांनी केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपायुक्त प्रसेनजित कारलेकर यांनी मानले. दरम्यान, या आयोजनाबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी नाट्य परिषदेचे अभिनंदन केले.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply