मधूनच एक बातमी येते, अमूकतमूक सिंगल स्क्रीन थिएटर अर्थात एकपडदा चित्रपटगृह बंद झालेय (त्यावर पडदा पडला) आणि मागील पिढीतील अनेक चित्रपट रसिक हळहळतात, कारण त्यांचे त्या जुन्या काळातील चित्रपटगृहाशी एक भावनिक नाते घट्ट झालेले असते. अगदी बालपणापासूनच तेथे अनेक चित्रपट पाहत पाहत आयुष्य पुढे सरकलेले असते. काहींच्या बाबतीत तर आपण स्टॉल, अप्पर स्टॉल, बाल्कनी असा नेमका कोणता चित्रपट पाहिला हेदेखील मेंदूत फिट्ट असते.
असेच एक विशेष उल्लेखनीय चित्रपटगृह अप्सरा. आज ते सुरू असते तर ते एकसष्ट वर्षांचे झाले असते. मला हे अप्सरा चित्रपटगृह अनेक कारणांमुळे आवडायचे. स्मरणरंजनात रमताना त्याच्या देखणेपणापासून तेथे पाहिलेल्या अनेक चित्रपटांपर्यंत अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात.
जुन्या एकपडदा थिएटर अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सचे प्रत्येकाचे आपले एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते अथवा आहे (जी अजूनही शिल्लक राहिली आहेत त्यांच्यासाठीही). प्रत्येक थिएटर एकापेक्षा वेगळे दिसायचे. (चित्रपट अभ्यासक्रमात हेही सांगायला हवे) त्या काळात म्हणजेच पन्नास साठ वर्षांपूर्वी फक्त चित्रपट पाहणे एवढ्यापुरतीच चित्रपटाची ओढ नसे, तर ते ओलांडून थिएटरशी नाते जुळत जाई. तेथे जाऊन अधिकाधिक चित्रपट पहावेसे वाटत. ते मेंदूत जणू नोंदवलेही जाई.
…अप्सरा चित्रपटगृह असे म्हणताक्षणीच पहिलं डोळ्यासमोर यायलाच हवं ते अतिशय चांगली आकर्षक अशी नक्षीकाम असलेली देखणी आणि ग्लॅमरस लूक असलेली भव्य वास्तू… आडव्या स्वरूपाचे चित्रपटगृह. मान उंचावून पाहत रहावी अशी वास्तू. देशात अशी देखणी एकपडदा चित्रपटगृह अनेक होती. त्यांचा इतिहास आणखी वेगळाच.
दक्षिण मुंबईतील विशेषतः धोबीतलाव, गिरगाव ते सात रस्ता आणि गिरगाव चौपाटी ते खेतवाडी/कुंभारवाडा, ताडदेव, गवालिया टॅन्क या परिसरात साठ, सत्तरच्या दशकात लहानाचे मोठे झालेल्या अगणित चित्रपट रसिकांना ही वास्तू एव्हाना आठवली असेलच. ही वास्तू डॉ. भडकमकर मार्गावरील गिल्डन लेन मैदानासमोर होती. दुर्दैवाने आज ती इतिहासजमा झाली आहे. त्याच्या कोणत्याही खाणाखुणाही दुर्दैवाने शिल्लक नाहीत. राहिल्यात फक्त आणि फक्त छान आठवणी, पण जेव्हा ती देखणी वास्तू होती तेव्हा अतिशय टुमदार अशी होती. आत शिरताच बाल्कनीकडे जाण्यासाठी तिरका परंतु पायर्या नसलेला जीना. आणि त्याखाली पाण्याचा हळूवार वाहता झरा. त्याचा एक लयबद्ध आवाज. संपूर्ण थिएटरला रेड कार्पेट. तुम्हीच सांगा, आपोआपच सकारात्मक मूड निर्माण होतो ना? तिकीट काढून आत शिरलो आणि सीटवर जाऊन बसलो अशी यांत्रिक गोष्ट नव्हती. सिनेमा असा मनात मुरत जायचा. त्यातील पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता तसेच तेथून एखाद्या वाहनाने अथवा अगदी चालत जरी जायचा योग आला तरी त्या थिएटरकडे आवर्जून पाहणे होई. मला सर्वप्रथम ’अप्सरा थिएटर’ माहीत झाले ते दिलीप कुमारची भूमिका असलेल्या ’गोपी’ (1970) या चित्रपटामुळे! अगदी लहानपणापासून रसरंग, मार्मिक, सोबत, मनोहर, प्रभंजन अशी साप्ताहिके वाचत असताना 1970 साली दिलीप कुमारचा ’गोपी’, देव आनंदचा ’जॉनी मेरा नाम’ आणि राज कपूरचा ’मेरा नाम जोकर’ या तीन चित्रपटातील स्पर्धेबाबत जे समजेल तसे वाचत होतो. त्या वर्षी टप्प्याटप्प्याने अथवा काही आठवड्यांच्या अंतराने हे तीन चित्रपट प्रदर्शित होत गेले. आणि त्यात समजले की, ’गोपी’ चित्रपट अप्सरा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्या काळात चित्रपट रसिकाची जडणघडण अशाही पद्धतीने होत असे. आपल्या सिनेमावेड्या देशातील हीदेखील एक महत्त्वाची गोष्ट.
मुळात अप्सरा थिएटरच्या जागी इंग्रजांच्या काळापासून लॅमिन्टन नावाचे थिएटर होते (आणि म्हणूनच हा रस्ता तेव्हापासून अगदी आजही लॅमिन्टन रोड म्हणून ओळखला जातो. नंतरचे नाव डॉ. भडकमकर मार्ग.) माझ्या अगोदरची पिढी लॅमिन्टन थिएटरची आठवण सांगताना ते फार पूर्वीच्या बसक्या थिएटरसारखे होते असे सांगतात. त्या लॅमिग्टन थिएटरमध्ये गृहस्थी, चार चांद असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, पण कालांतराने मला वेगळी व उपयुक्त माहिती मिळाली. या लॅमिन्टन चित्रपटगृहाच्या जागी मूकपटाच्या काळात म्हणजेच विसाव्या शतकात प्रेशियस नावाचे चित्रपटगृह होते. त्यात मूकपट प्रदर्शित होत असतानाच जादूचे प्रयोग, वाद्यवृंद हेदेखील होत. त्या जागी तिसाव्या शतकात रियाल्टो या नावाचे चित्रपटगृह उभे राहिले. त्या जागीच चाळीसच्या दशकात लॅमिन्टन हे चित्रपटगृह उभे राहिले. चित्रपटगृहाच्या इतिहासाच्या खोलात जाऊन अशी माहिती मिळवणे हेदेखील चित्रपटाचा एक प्रकारचा अभ्यासच.
लॅमिन्टन थिएटर पाडून त्या जागी 1964 साली भव्य असे वातानुकूलित अप्सरा चित्रपटगृह उभे राहिले. बाराशे आसनक्षमता असलेल्या या अतिशय देखण्या आणि भव्य चित्रपटगृहाच्या उद्घाटनाचा पहिला चित्रपट तसाच बहुचर्चित आणि उच्च दर्जाचा असायला हवा ना? तसाच फिल्मी फंडा हवा ना? तो होता, आर.के. फिल्म बॅनरचा राज कपूर दिग्दर्शित ’संगम’. आर.के. फिल्म बॅनरचा हा पहिला रंगीत चित्रपट आहे. ’संगम’ या चित्रपटाला चक्क दोन मध्यंतरे होती आणि दोन मध्यंतरे असलेला तो आपल्याकडचा पहिला चित्रपट होता. राज कपूर, वैजयंतीमाला आणि राजेंद्रकुमार अशा प्रेम त्रिकोणाच्या थीममध्ये युरोपचे मोठ्या प्रमाणावर शूटिंग गीत, संगीत व नृत्य आणि या सगळ्याला राज कपूरचा खास दिग्दर्शनीय टच यांची केमिस्ट्री जमली होती.
’संगम’ या चित्रपटाने 18 जून 1964 या दिवसाच्या मुहूर्तावर सकाळी 10 वाजता भव्य प्रीमियरने या अप्सरा चित्रपटगृहाचे उद्घाटन झाले. या शोला चित्रपट समिक्षकांना आवर्जून आमंत्रित केले. हा पहिला शो संपल्यावर या चित्रपटगृहात खास जेवणाचा बेत होता. राज कपूर कायमच ओल्या (चिअर्स) फिल्मी पार्टी संस्कृतीसाठी नावाजला गेला, पण या वेळी श्रीखंड पुरी अतिशय चविष्ट होती असे मागील पिढीतील पत्रकार आवर्जून आठवण काढत चवीचवीनं सांगत. आपण राज कपूरचं खाल्लं अशीच एक सुप्त भावना त्यात असे. त्याचा आनंद होई.
’संगम’ने त्या काळातील सुपर हिट पिक्चरप्रमाणे अप्सरा थिएटरमध्ये पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला. ’संगम’ची लांबी चार तासापेक्षा जास्त असल्याने त्याला दोन मध्यंतर होती. त्यामुळे शोच्या वेळा सकाळी 11 वाजता, साडेतीन वाजता आणि 8 वाजता अशा होत्या.
अप्सरा चित्रपटगृहाची वास्तू अतिशय प्रसन्न आणि कायमच सकारात्मक वातावरण असणारी अशी होती. तुम्ही चित्रपट पाह्यला या असे जणू ती खुणवायची. माझ्याप्रमाणेच इतरांच्याही अशाच भावना असणार. स्टॉल, अप्पर स्टॉल आणि बाल्कनी असे तीन प्रकार होते. खालच्या आणि वरच्या मजल्यावरील सिनेमाची शो कार्ड्स पाहण्यास अनेक चित्रपट रसिकांना आनंद मिळे. सिनेमा सुरु होण्यापूर्वी अशी शो कार्ड पाहणे अनेक रसिक पिढ्यांचे जणू वेड होतं. बाहेरच्या बाजूलाही डावीकडे अशी शो कार्ड्स पाहण्यास मिळत. अप्सरा थिएटरमध्ये 3, 6 आणि 9 असे दिवसा तीन खेळ असत. तसेच मॅटीनी शोला कधी जुने, तर कधी नवीन चित्रपट प्रदर्शित होत. बाह्यदर्शनी भागावरचे प्रदर्शित चित्रपटाचे पोस्टर डेकोरेशन पाहण्यात विशेष आनंद मिळे. तो काळच वेगळा होता. ते दिवसच वेगळे होते. पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपट व पाच दिवसाचा क्रिकेट कसोटी सामना हे सर्वसामान्यांच्या जगण्यातील मोठाच आधार असे. दक्षिण मुंबईतील जवळपास सर्वच चित्रपटगृहे ही पूर्वी मेन थिएटर होती. तेव्हाची चित्रपट रिलीजची पारंपरिक संस्कृती. ती आज हरवली आहे आणि आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला ती माहीत नाही, मात्र त्यांनी जुन्या काळातील चित्रपट जाणून घेताना चित्रपटगृह संस्कृतीही समजून घ्यावी.
‘अप्सरा’त अनेक चित्रपट भारी हिट ठरले. तुमसे अच्छा कौन है, शर्मिली, हीर रांझा, सफर, हसते जख्म, त्रिशूल, धर्मा (चांद दिग्दर्शित या चित्रपटातील प्राण आणि बिंदू यांच्यावरील राज की बात कहेदू तो ही कव्वाली सुरु झाली की प्रेक्षक पडद्यावर पैसे उडवत. तसे करू नका असे वृत्तपत्रातील जाहिरातीत म्हटले जाई ते बहुदा चित्रपटाच्या पब्लिसिटीचा एक फंडा असावा), प्रेम रोग, शराबी, क्रांती, संन्यासी, गोपी (दिलीप कुमार आणि सायरा बानूने लग्नानंतर पहिल्यांदा एकत्र भूमिका साकारली), त्रिशूल, युध, नाम, नूरी, बेताब, नाम वगैरे वगैरे. त्या काळात पब्लिकला पिक्चर आवडला रे आवडला की ज्युबिली हिट नक्की. सत्तरच्या दशकात अप्सरा थिएटरमध्ये स्टॉलचे तिकीट दर दोन रुपये 20 पैसे, अप्पर स्टॉल तीन रुपये 30 पैसे आणि बाल्कनी तिकीट दर चार रुपये चाळीस पैसे असे होते. मनोजकुमार आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख असलेल्या सोहनलाल कंवर दिग्दर्शित ’संन्यासी’पासून ते वाढले. तोही येथे ज्युबिली हिट.
काही चित्रपटांनी ‘अप्सरा’त शंभर दिवसांचे यश संपादले. ते आहेत, शिर्डी के साईबाबा, दो अन्जाने, दुसरा आदमी, रखवाला, जानेमन, इन्साफ (ऐंशीच्या दशकात विनोद खन्नाने या चित्रपटाव्दारे केलेल्या कमबॅकला रसिकांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की सोमवारी आगाऊ तिकीट विक्रीची खिडकी उघडण्यापूर्वीच विनोद खन्नाच्या फॅन्सची अक्षरशः प्रचंड झुंबड उडाली आणि शुक्रवारी सिनेमा रिलीज होईपर्यंत आठवड्याची तिकीटे हाऊसफुल्ल. तो ’भरलेला चार्ट’ पाहणेही एक थ्रील असे.), सौतन, खून भरी मांग वगैरे वगैरे. महेश भट्ट दिग्दर्शित ’काश’ येथे बरा चालला म्हणायचे.
काही चित्रपटांनी ‘अप्सरा’त मॅटीनी शोला यश प्राप्त केले. अमोल पालेकर यांची भूमिका असलेला बी.आर. फिल्म निर्मित आणि बासू चटर्जी दिग्दर्शित ’छोटी सी बात’ येथे मॅटीनी शोला रिलीज होताना तो एक स्वच्छ मनोरंजक चित्रपट म्हणून रिलीज झाला होता, त्यात तथ्यही आहे, पण माऊथ पब्लिसिटीवर हा चित्रपट असा काही यशस्वी ठरला की त्याने येथे 25 आठवड्यांचा मुक्काम केला. रवींद्र महाजनी यांनी भूमिका साकारलेला हिंदी चित्रपट ’बेअब्रू’नेही येथे मॅटीनी शोला रौप्यमहोत्सवी यश संपादले. रेश्मा और शेरा, अपने पराये, अगर, आंचल, रंगबिरंगी, प्यारी बहेना, जवानी, कॉल गर्ल हे येथे मॅटीनी शोला रिलीज झाले, तर आमिर खान आणि जुही चावला यांना स्टार केलेला मन्सूर खान दिग्दर्शित ’कयामत से कयामत तक’ही येथे मॅटीनी शोला रिलीज होताना पहिल्या दिवशी आवर्जून कॉलेजमधील युथला आमंत्रित केले होते. त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून हा चित्रपट सुपर हिट नक्कीच होणार असा जणू सिग्नल मिळाला. आणि पुढे काय घडले हे तुम्हाला माहिती आहेच. विशेष म्हणजे, आपण कयामत से कयामत तकच्या विशेष खेळाला अप्सरा थिएटरला कसे पोहचलो याची आमिर खान आजही एखाद्या मुलाखतीत आठवण सांगतो, पण तेव्हा त्याला अप्सरा थिएटरचे नाव आठवत नाही हो…
‘अप्सरा’त जोरदार आपटलेला पिक्चर ओ. पी. रल्हन निर्मित आणि दिग्दर्शित ’तलाश’. बलराज सहानी, राजेंद्र कुमार, शर्मिला टागोर आणि खुद्द ओ.पी. रल्हन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची ’एक कोटीचा चित्रपट’ अशी अगदी महागडी जाहिरात करण्यात आली होती. चौपन्न वर्षांपूर्वी एक कोटीही अक्षरक्षः प्रचंड मोठी रक्कम होती. त्या काळात मध्यमवर्गीय कुटुंबात मासिक तीनशे रुपये पगार म्हणजे खूप मोठा आनंद असे. यावरून एक कोटीची किंमत काढा. या अपयशाची बरीच चर्चा झाली. अप्सरा थिएटरमध्ये हिन्दुस्तान की कसम, 36 घंटे, गुलाम बेगम बादशाह, द चीट, हमशकल (या चित्रपटात राजेश खन्नाची दुहेरी भूमिका आहे. तनुजा आणि मौसमी चटर्जी अशा दोन नायिका असलेल्या या चित्रपटाची गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाची पटकथा संवाद सलिम जावेदचे आहेत, पण राजेश खन्नाने त्यात बरेच फेरफार केल्याने सलिम जावेद यांनी आपले नाव मागे घेतल्याचे त्या काळात गॉसिप्स गाजले.), अपने रंग हजार, हमारे तुम्हारे, छत्तीस घंटे, अपने रंग हजार, देशप्रेमी, विश्वनाथ, आखरी गोली, टक्कर, जोशिले ( शेखर कपूरने हा चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच दिग्दर्शन सोडले आणि निर्माते सिबते हसन रिझवी यांना हा चित्रपट पूर्ण करावा लागला),… तर मॅटीनी शोला घुंगरी की आवाज (रेखाने विजय आनंदशी वाद घातल्याने रखडवलेला चित्रपट), नौकरी (राजेश खन्नाच्या पडत्या काळातील राज कपूरसोबतचा ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट) असे अनेक चित्रपट आले तेच गेले.
एके दिवशी बातमी आली की ही वास्तू पाडण्यात येऊन नवीन चकाचक इमारतीत वरच्या मजल्यावर तीन मल्टीप्लेक्स स्क्रीन देणार. बदलत्या काळानुसारचा बदल.
काही महिन्यांतच नवीन इमारत उभी राहिली आणि त्यात तीन छोटे स्क्रीन आले. नवीन युगाचा हा नवीन फंडा होता, पण याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा सिनेमा थिएटरचा फिल येत नव्हता आणि काही कारणास्तव हे स्क्रीन बंदही झाले. ते सुरू होणार अशी अधूनमधून कुठून तरी बातमी येते आणि जाते.
असे करता करता अप्सरा चित्रपटगृह आठवणीत जमा झाले. आजही तेथून जाताना ती रूबाबदार वास्तू आणि त्यात आवडीने पाहिलेले आणि अधिकच आवडलेले असे छोटी सी बात, प्रेम रोग, शराबी, बेताब असे चित्रपट नक्कीच आठवतात…अप्सरा थिएटरची देखणी वास्तू आजही डोळ्यासमोर आहे. आज तेथून जाताना आपण आपले आवडते अप्सरा थिएटरच पाहतोय असा फिल येतो. खरंच एक युग सिनेमा थिएटर आवडावे असेही होते. आणि एकादी वास्तू आवडत असेल, तर स्वाभाविकच त्यातील अनेक गोष्टीही आपल्याशा वाटतात/पहाव्याशा वाटतात. आपल्या देशातील चित्रपटाचे वेड अशा मार्गानेही जाते…आणि त्याच वेडाने आपल्या देशातील चित्रपट संस्कृती घडवली.
अप्सरा चित्रपटगृह ही एक स्वतंत्र ओळख होती. मूकपटापासूनचा या मूळ वास्तूचा प्रवास होता. मुंबई बदलत बदलत गेली तशी अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स काळाच्या पडद्याआड जात राहिलीत, पण तेथील पडद्यावरचे चित्रपट त्या वास्तूची आठवण करून देतात.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper