Breaking News

सुरक्षा उपायांची शिस्त

उज्ज्वल भावी आयुष्याची स्वप्ने बघणार्‍या या मुलांचे जीवन व्यवस्थेतील अक्षम्य त्रुटींमुळे अर्धवट संपून गेले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा मोठा असल्यामुळे आणि त्यात तरुण विद्यार्थ्यांचा बळी गेल्याने पुन्हा एकदा आगीसंदर्भातील सुरक्षा उपाययोजनांची चर्चा सुरू झाली आहे. आपल्याला नेहमीच दुर्घटनेनंतरच उपरती होते, तसेच या खेपेलाही आहे.

सुरतमध्ये एका कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये चालवल्या जाणार्‍या कोचिंग क्लासेसमध्ये आग लागून 22 तरुण विद्यार्थ्यांचा  हकनाक बळी गेला. मृतांमधील बहुतेक विद्यार्थी हे नुकतेच बारावी उत्तीर्ण झाले होते आणि पुढील प्रवेशपरीक्षांची तयारी करीत होते. कोचिंग क्लासेस ही यंत्रणाच मुळात पैसे कमावण्याच्या हेतूने चालवली जात असल्याने कमीत कमी जागेत जास्तीत जास्त मुले कोंबून बक्कळ कमाई करणे हाच हेतू सगळीकडे दिसून येतो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या संपूर्ण पट्ट्यात तब्बल 65 लाख मुले निरनिराळ्या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतात, असे सांगितले जाते. मात्र तरीही आजही हे क्षेत्र सर्वसाधारणपणे असंघटित व अनियंत्रित असेच आहे. कोचिंग क्लासेस कायद्यामार्फत त्यांना नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अद्याप ते पूर्णत्वास गेलेले नाहीत. त्यामुळे जिथे कमीत कमी भाडे द्यावे लागेल अशा इमारतींमध्ये बहुदा हे क्लासेस चालवले जातात. त्यामुळे मोठ्या संख्येने एका जागी जमणार्‍या मुलांची सुरक्षितपणे ये-जा होईल, आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा वेगळा मार्ग वगैरे उपाययोजना तर कुणाच्या खिजगणतीतही नसतात. परंतु आता सुरत घटनेपाठोपाठ यासंदर्भात आपल्या पाठीत दट्ट्या बसेल हे हेरून ठिकठिकाणच्या कोचिंग क्लास चालवणार्‍या मंडळींनी यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. शनिवारी मुंबईत 750 क्लासमालकांनी सभा घेऊन क्लासेसच्या संदर्भातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. कोचिंग क्लासेस हे क्वचितच स्वत:च्या इमारतीत चालवले जातात. ते बहुदा कमर्शिअल वा निवासी इमारतीत चालवले जात असल्याने आगीसंदर्भातील सुरक्षा उपाययोजना ही आपल्या हातात नसते, ही क्लासचालकांची बाजू त्यांनी या सभेत ठळकपणे मांडली आणि पाठोपाठ चालकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली. यात बेसमेन्ट वा टेरेसवर क्लास चालवू नये, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा सुरक्षित मार्ग आहे याची खातरजमा करूनच क्लास चालवले जावेत, क्लासमधील विजेच्या वायरिंगची तपासणी करावी- जेणेकरून शॉर्टसर्किटसारख्या घटना टाळता येतील, प्रत्येक वर्गात अग्नीसुरक्षा उपकरणे ठेवावी, वर्गात मुलांची गर्दी टाळावी, आगीसंदर्भात विद्यार्थ्यांना तसेच कर्मचार्‍यांना पूर्वप्रशिक्षण द्यावे, आपल्या जागेचे फायर ऑडिट करून घ्यावे तसेच नजिकच्या अग्निशमन दलाचे दूरध्वनी क्रमांक सगळ्यांना दिसतील अशा पद्धतीने दर्शनी लावावेत आदी सूचनांचा यात समावेश आहे. अर्थातच आगीसंदर्भातील या सुरक्षाविषयक सूचनांचे पालन निव्वळ क्लासेससंदर्भातच नव्हे तर जिथे-जिथे लोक मोठ्या संख्येने जमतात वा बसतात अशा प्रत्येक ठिकाणी व्हायला हवे आहे. वास्तवत: आगीसारख्या घटना क्षुल्लकशा कारणाचे निमित्त होऊन कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी घडू शकतात. त्या टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, त्यातूनही दुर्दैवाने तसा प्रसंग उद्भवल्यास त्यास तोंड देण्यास सज्ज राहणे हा आपल्या जीवनातील शिस्तीचा भाग होण्याची गरज आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply