पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष आणि या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणारे आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 19) सुकापूर येथे आयोजित संकल्प सभेत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपप्रणित सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारच्या जनहितार्थ कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी संकल्प सभांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने पनवेल तालुका पूर्ण मंडळाच्या वतीने सुकापूर येथील लक्ष्मी पब्लिक स्कूलमध्ये संकल्प सभा झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोदी सरकारच्या मागील 11 वर्षांतील प्रमुख कामगिरीचा विस्तृत आढावा सादर केला.
या सभेला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, तालुका चिटणीस यतीन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.
आमदार ठाकूर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने केवळ विकासाची आश्वासने दिली नाहीत, तर ती प्रत्यक्षात उतरवून दाखवली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला असून हे सरकार केवळ बोलणारे नव्हे, तर संकल्पांना कृतीत उतरवणारे सरकार आहे.
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
Check Also
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper