Breaking News

खारघरवासीयांच्या गळ्याचा घोट घेणारे वाईन शॉप चालू देणार नाही -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
खारघरवासीयांच्या गळ्याचा घोट घेणारे वाईन शॉप चालू देणार नाही तसेच येत्या अधिवेशनामध्ये या विषयी आवाज उठवेन, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 20) खारघरमध्ये दारूबंदीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात दिली.
खारघर सेक्टर 6 येथील शहा आर्केड सोसायटीची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना गोल्डन कॉइन वाइन मार्ट हे दारू विक्रीचे सुरू करण्यात आले आहे. या विरोधात संघर्ष संस्थेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात खारघरवासीय आणि सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या आंदोलनामुळे गोल्डन कॉइन वाइन मार्ट तसेच जेजेस रसोई या रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बारने बांधलेले अनधिकृत बांधकाम पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पाडण्यात आले.
खारघर हा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिकदृष्ट्या विकसित होत असलेला परिसर आहे. येथील नागरिकांनी अनेक वेळा खारघरला दारूमुक्त झोन घोषित करण्याची मागणी केली आहे. रहिवासी आणि सामाजिक संस्थांचा विरोध असतानाही वाईन शॉप सुरू केले गेले आहे. खारघर संघर्ष समिती, लोकप्रतिनिधी आणि रहिवासी संघटनांकडून शासन दरबारी सातत्याने दारूबंदीबाबत पाठपुरावा सुरू आहे, मात्र 14 जूनला शहा आर्केडमध्ये वाईन शॉप सुरू झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त नागरिकांनी तीव्र निषेध करत वाईन शॉप त्वरित बंद करण्यात यावा आणि खारघरला कायमचा दारूमुक्त झोन घोषित करावे, अशी मागणी केली आहे.
खारघर शहराला शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. शहरामध्ये विविध माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालये अस्तित्वात असून खारघरची नोंद नो लिकर झोन अशी अनेक वर्षांपासून आहे, मात्र असे असतानाही खारघरमध्ये वाईन शॉप सुरू करण्यात आले. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाइन शॉपची परवानगी रद्द करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटलेय की, खारघर येथील नागरिकांचा सुरुवातीपासूनच खारघरमध्ये दारू दुकाने आणि दारू बार येण्यास सक्त विरोध आहे. खारघरमध्ये दारूबंदीविषयी अनेक आंदोलने, निदर्शने झालेली आहेत. खारघर शहर दारूमुक्त घोषित करावे यासाठी जानेवारी 2025पासून संघर्ष संस्थेच्या माध्यमातून शासनाकडे मागणी केलेली असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनआंदोलन सुरू आहे.
गोल्डन कॉईन वाईन मार्ट हे नवीन वाईन शॉप खारघर सेक्टर 6 येथे उघडण्यात आले आहे. या वाईन शॉपला सोसायटी किंवा पनवेल महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समजते. वाईन शॉपला परवानगी दिली असल्यास ती रद्द करण्यात यावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
दरम्यान, खारघरमध्ये दारूबंदीसाठी शुक्रवारी संघर्ष संस्थेच्या माध्यमातून सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. गोल्डन कॉईन वाईन मार्टने अनधिकृतपणे बांधलेले शेड या वेळी महापलिकेच्या वतीने पाडण्यात आले. त्यानंतर जेजेस रसोई या रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बारने बांबूचे शेड बांधण्याची परवानगी असतानाही लोखंडी बांधकाम काम केले होते. त्या विरोधात आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत जाब विचारला तसेच अनधिकृतपणे बांधण्यात आलेले बांधकाम महापालिकेच्या माध्यमातून पाडले.
या वेळी आमदार विक्रांत पाटील यांनी जनतेच्या भावनांना न्याय देण्यासाठी जो काही संघर्ष करावा लागेल तो करू, असे प्रतिपादन केले. या आंदोलनात भाजप जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, शत्रुघ्न काकडे, गुरूनाथ गायकर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिद्रे, शहराध्यक्ष साधना पवार, मंडळ सरचिटणीस दीपक शिंदे, संतोष शर्मा, उपाध्यक्ष किरण पाटील, अमर उपाध्याय, समीर कदम, निर्मला यादव, प्रिया दळवी, जुमा चक्रवर्ती, संजय घरत, कीर्ती नवघरे, अजय माळी, शैलेंद्र त्रिपाठी, अशोक जांगिड, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, संघर्ष संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि खारघरमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply