Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर हे कर्णाचा अवतार, त्यांच्यासारखा दिलदारपणा मी कुणामध्ये पाहिला नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

सांगली ः प्रतिनिधी
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे कर्णाचा अवतार आहेत. त्यांच्यासारखा दिलदारपणा मी कुणामध्येच पाहिला नाही. पैसे तर सगळेच कमावतात, मात्र ते देण्याची दानत ही फक्त रामशेठ ठाकूर यांच्यामध्ये आहे. त्यामुळे मी महाराष्ट्राच्या तमाम 13 कोटी जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील इस्लामपूर येथे काढले.
महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित प्रा.डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि डॉक्टर एन.डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन शनिवारी (दि. 16) मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
या सोहळ्याला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, खासदार धैर्यशील माने, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार रोहित पवार, दिवंगत प्रा. डॉ.एन.डी. पाटील यांच्या पत्नी व संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सरोज पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी प्रा.डॉ. एन.डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहासाठी जिल्हा योजना अनुदानातून 10 कोटी रुपये देण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्याचप्रमाणे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एक कोटी रुपयांची, तर आमदार रोहित पवार यांनी 40 लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
आपल्या भाषणात संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सरोज पाटील यांनीही, लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजे हिरा आहेत. एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कमवा आणि शिका हा मंत्र घेऊन शिक्षण पूर्ण केले तसेच पुढे ते मोठे उद्योजक झाले. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रामाणिक, प्रेमळ आणि दयाळू असून त्यांनी 100 कोटीहून अधिक रुपये संस्थेला दिले आहेत. त्यामुळे रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेला लाभलेले रत्न आहेत, असे गौरवोद्गार काढले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, डॉ. एन.डी. पाटील आणि सरोज पाटील यांनी माझ्यावर भरपूर प्रेम केले असून रयत शिक्षण संस्था ही माझी मातृसंस्था आहे. त्यामुळे संस्थेला जी काही मदत लागेल ती मी सर्वतोपरी करेन, असा शब्द दिला.
कार्यक्रमाला बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आशिष देशमुख, कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, महेश चोथे यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply