पनवेल ः रामप्रहर वृत्त
दीपावलीची सोनेरी पहाट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वरांची बरसात अशा द्विगुणित आनंदात पनवेलकर रसिकांनी मंगळवारी (दि. 21) ‘दिवाळी पहाट’चा मंत्रमुग्ध करणारा अनुभव घेतला. निमित्त होते लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून पनवेल महानगरपालिका आयोजित आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित सुश्राव्य संगीत मैफिलचे.
दीपावली म्हटली की दिव्यांचा, आनंदाचा आणि संस्कृतीचा सण. या सणानिमित्त लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वत्र आनंद आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळते. त्यात सुरांच्या अविष्कारांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. पनवेलमधील निसर्गरम्य अशा वडाळे तलाव येथे झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाने सप्तसुरांची उधळण करत नेहमीप्रमाणे येथील संस्कृतीमध्ये भर घातली.
सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे व श्री. जयदीप यांच्या सुमधूर सुरांना रसिकांनी भरभरून दाद दिली. त्याचबरोबर वाद्यवृंद समूहानेही आपल्या वादनातून उपस्थितांची वाहवा मिळवली. निवेदक विनित देव यांनी आपल्या उत्तम निवेदन करत या कार्यक्रमात आणखी रंगत आणली. या वेळी वातावरण सात्विक व आल्हाददायी बनले होते.
उदंड प्रतिसाद लाभलेल्या या दिवाळी पहाटची सुरुवात सूर निरागस हो गणपती या गीताने झाली. पुढे कानडा राजा पंढरीचा, वाहतो या इथे ज्ञानरूपी झरा, धुंद होते शब्द सारे, आज म्हारे घर आओ, पांडुरंग नामी लागला ध्यास, मन उधाण वार्याचे, स्वर सुखाची सावली, ओल्या सांजवेळी, उरले उरात काही, शारद सुंदर, मला वेड लागले प्रेमाचे, आता वाजले की बारा, अप्सरा अशी एकाहून एक सरस गाणी सादर झाली, तर समारोप पसायदानाने झाला. या सुरेल मैफिलीचा पनवेलकरांनी कुटुंबासह व मित्रपरिवारासह मनमुराद आनंद घेतला.
या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची मान्यवर म्हणून प्रमुख उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जेष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, प्रांताधिकारी पवन चांडक, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, भाजपचे माजी शहराध्यक्ष जयंत पगडे, अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अॅड. प्रकाश बिनेदार, उपाध्यक्ष गणेश कडू, नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ यांच्यासह विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यंदा व्यासपीठही अत्यंत आकर्षक होते. यात देवीचे रूप आणि पैठणीचा साज विशेष आकर्षणे होती. त्याचबरोबर रसिकांसाठी 4500 हजार खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. रेकॉर्डब्रेक रसिकांची गर्दी झाल्याने आसनव्यवस्था पूर्णपणे भरून गेली होती. त्यामुळे रसिकांनी परिसरात भेटेल त्या जागी काहींनी बसून, तर काहींनी उभे राहून या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला. उत्तम आयोजन आणि संयोजनात झालेल्या यंदाच्या या ‘दिवाळी पहाट’चे नववे वर्ष होते. या कार्यक्रमाला उदंड असा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.
पनवेलकर सांस्कृतिक वारसा जपणारे आहेत. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. मी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर आणि समस्त पनवेलकरांचे आभार मानते. सुंदर ‘दिवाळी पहाट’चे आयोजन आणि चांगला रसिकवर्ग असल्याने पुन्हा पुन्हा यावे असे मनापासून वाटते.
-बेला शेंडे, सुप्रसिद्ध गायिका
पनवेल सांस्कृतिक चळवळ जपणारे आहे. आजच्या कार्यक्रमाला पाच हजारांहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवून भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे कार्यक्रमाची जागा अपुरी पडली. अशाच प्रकारच्या उपक्रमांद्वारे आपण पनवेलची सांस्कृतिक चळवळ अधिक वृद्धिंगत करत राहू. उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!
-परेश ठाकूर, माजी सभागृहनेते, पनवेल महापालिका
Check Also
उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम
भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …
RamPrahar – The Panvel Daily Paper