Breaking News

विद्यार्थ्यांमधून वैज्ञानिक तयार व्हावेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला अधिकाधिक वाव मिळाला पाहिजे. विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्ती ही नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिकाधिक जागृत व्हावी आणि विद्यार्थ्यांमधून वैज्ञानिक तयार व्हावेत, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते कामोठे येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बोलत होते.
‘रयत’च्या कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गुरुवारी (दि. 11) आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन समारंभास ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, रायगड विभागीय सहाय्यक अधिकारी विलासराव जगताप, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शाहू सतपाल, वरिष्ठ विस्तार अधिकारी सीताराम मोहिते, शालेय पोषण आहार अधीक्षक नवनाथ साबळे, पनवेल गणित-विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष पंडित फंगाळ, गटशिक्षण अधिकारी ललिता मॅडम, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेवक आशा भगत, पीआरओ बाळासाहेब कारंडे, सीकेटी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
या विज्ञान प्रदर्शनास दीडशेहून अधिक शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वेगवेगळ्या विषयांवरील तब्बल 217 वैज्ञानिक प्रकल्प प्रदर्शनात सहभागी झाले. प्राथमिक गटात 113, माध्यमिक गटात 65, दिव्यांग तीन, आदिवासी चार, तर शिक्षकांच्या प्रकल्पांची संख्या 27 इतकी होती. प्रदर्शनास विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Check Also

उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …

Leave a Reply