पक्षविरोधी कारवाई : आरपीआयच्या नऊ जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन

सात जणांना कारणे दाखवा नोटीस

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक पक्षाचा आदेश न मानणे, पक्षविरोधी कारवाया करणे, पक्षशिस्त मोडणे, संघटनात्मक कामकाजास बाधा निर्माण करणे, निवडणूक प्रक्रियेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणे, पत्रकार परिषद घेऊन जिल्हा अध्यक्षांविषयी आक्षेपार्ह विधाने करणे तसेच पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात भूमिका घेणे या गंभीर कारणांमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेल महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त निरीक्षक व प्रभारी नरेंद्र गायकवाड यांनी नऊ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षांसाठी निलंबन केले आहे.
पक्ष संघटना मजबूत ठेवणे, कार्यकर्त्यांमध्ये शिस्त व एकात्मता राखणे तसेच जनतेसमोर पक्षाची सकारात्मक प्रतिमा कायम ठेवणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. निलंबनाच्या कालावधीत संबंधित व्यक्तींना कोणतेही पक्षीय पद अथवा जबाबदारी राहणार नाही तसेच सात जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
मोहनिश गायकवाड (प्रभारी, पनवेल महानगर क्षेत्र), प्रभू जाधव (खारघर), विजय गायकवाड (तळोजा), प्रवीण जाधव (पनवेल), शरद पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), नवीन सोनावणे (कळंबोली), राजू इंगळे (खांदा कॉलनी), संतोष सोनकांबळे (खारघर), सूरज कदम (कळंबोली) यांचे निलंबन करण्यात आले आहे, तर पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून हिरामण गायकवाड, विजय पवार (तालुका अध्यक्ष, पनवेल), सुनील सप्रे, जयप्रकाश पवार, जीवक गायकवाड, अशोक गोतारणे, नितीन मोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून ही नोटीस प्राप्त झाल्यापासून चार दिवसांच्या आत लेखी खुलासा न केल्यास पक्षातर्फे त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे नरेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांसाठी भाजप महायुतीकडून पाच जणांचे अर्ज दाखल

युवा नेते परेश ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, गणेश कडू, अ‍ॅड. प्रथमेश सोमण, दिनेश खानावकर यांचा …

Leave a Reply