पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री रामनवमीचे औचित्य आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल, उत्तर रायगडच्या वतीने एका विशेष सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.‘ अवघ्या आशा श्रीरामार्पण’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून गीत रामायणाच्या माध्यमातून रामतत्त्वाची कालसुसंगत मांडणी २२ मार्च रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अत्यंत दिमाखात सादर करण्यात आली. भक्ती, संस्कृती आणि सुरेल संगीताचा त्रिवेणी संगम असलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित शेकडो रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यक्रमाला भेट देऊन सादरीकरणाचा आस्वाद घेतला. रामायणातील विचार आजही तितकेच प्रेरणादायी असून संगीताच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. या सांस्कृतिक सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, आयोजक व नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, गणेश कडू, सुमित झुंजारराव, माजी नगरसेविका सारिका भगत, रुपेश नागवेकर, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, श्याम पुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात स्नेहल दामले यांनी प्रभावी कथनातून रामायणातील प्रसंग जिवंत केले, तर अभिजीत पंचभाई आणि श्रुती देवस्थळी यांच्या भावपूर्ण गायनाने वातावरण भक्तिमय झाले. त्यांना उद्धव कुंभार, अमित कुंटे आणि प्रसन्न बाम यांनी दर्जेदार वाद्यसंगत दिली.
दरम्यान, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper