अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर व किहीम येथील बंगल्यामधून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटमधील आरोपींकडे सापडलेल्या कोकेनचे धागेदोरे नायजेरियापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी कोकेन विकणार्या चार नायजेरियन नागरिकांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 260 ग्रॅम कोकेन जप्त केले असून, बाजारात त्याची किंमत 13 लाख रुपये आहे.
ओकोरो ल्यक पॉल, युझोग्बी फडनंड मेलोदी या दोन नायजेरियन आरोपींना याआधी अटक करण्यात आली असून, कोडीचीन्मा प्रोमिस यूची (38) व ओलुवेदर स्ट्रीट लोगस अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
28 जून रोजी अलिबागच्या किहीम परिसरातील चिराणिका फार्म व कनकेश्वर फाटा परिसरातील सक्सेना फार्म येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी राखी नोटानी व रंजिता सिंग उर्फ रेणू यांच्याकडून स्थानिक गुन्हे पथकाने 26 ग्रॅम कोकेन जप्त केले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ओकोरो ल्यक पॉल, युझोग्बी फडनंड मेलोदी या दोन नायजेरियन नागरिकांना व हुसैन मुझफर रझानी, मनीष दौलत टुकरेल, दीपक अर्जुन अगरवाल या पाच जणांना अटक केली असता त्यांच्याकडूनही 50 ग्रॅम कोकेन जप्त केले होते.
स्थानिक गुन्हे पथकाने 14 जुलै रोजी पहाटे 2 वाजता सापळा रचून कोडीचीन्मा प्रोमिस यूची, ओलुवेदर स्ट्रीट लोगस या दोघांना मुंबई येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी 181 ग्रॅम कोकेन जप्त केले असून, त्याची बाजारात नऊ लाख पाच हजार किंमत आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात पोलिसांनी 20 आरोपींना अटक केली, तर 260 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची किंमत 13 लाख रुपये आहे.
गुन्ह्यात पकडलेल्या आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर केले असता 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या सूचनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख, उपनिरीक्षक अमोल वळसंग व कर्मचारी करीत आहेत.