Breaking News

रोह्यात मुसळधार पाऊस; रस्ते जलमय

रोहे ः प्रतिनिधी

रोहे शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी (दि. 23) जोरदार पाऊस पडून ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी जमा झाले होते. रोहा-नागोठणे मार्गसुद्धा जलमय झाला होता. निडी येथे एका घरावर दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे; तर निडीमध्येच एक ट्रक उलटला. दिवसभर पावसाने रोह्यात मुसळधार हजेरी लावल्याने संपूर्ण वातावरण पाऊसमय झाले होते.

पावसाने यंदा उशिरा सुरुवात केली. त्यानंतर तो गायब झाला होता. सोमवारी सायंकाळी रिमझिम पाऊस पडला. मंगळवारी दुपारनंतर मात्र पावसाने रोह्यात जोर धरला. या पावसामुळे रोहा शहरातील सागर डेअरीसमोर, कोर्ट मार्गावर, नवरत्न रस्त्यावर, सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या आवारात पाणी साचले होते.

मुसळधार पावसात निडी येथील एका घरावर सायंकाळी 4.30च्या सुमारास दरड कोसळून भिंत पडली. या वेळी पाटील कुटुंबीय घरात नसल्याने सुदैवाने बचावले. घराचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

रोहे-नागोठणे मार्गावर पेपर मिल, पडम रेल्वेगेट, खारापटी, निडी आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी आले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने एक झायलो गाडी झाडावर आदळली. यात गाडीचे नुकसान झाले आहे. दुसर्‍या घटनेत साळाव येथे चाललेला ट्रक निडी थांब्यासमोर उलटला. त्यामुळे या रस्त्यालगत असलेला विद्युत डिपीचा खांब कोलमडला. परिणामी यावर अवलंबून असलेल्या गावांत वीजपुरवठा खंडित झाला. याचा फटका निडी, मेढा व यशवंतखार विभागाला बसला. काही घरांतील टीव्ही, फ्रीजसह विद्युत उपकरणे नादुरूस्त झाली आहेत.

रोहा शहारासह ग्रामीण भागात सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस बरसत होता. त्यामुळे डोंगरमाथ्यावरून पाणी कुंडलिका नदीत येत होते.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply