Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात प्रशिक्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आजीवन शिक्षण व विस्तार विभागातर्फे (डीएलएलई) प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या वेळी लेंगरेकर यांनी विविध स्पर्धा परीक्षाविषयक संधींची माहिती दिली, तसेच विद्यार्थ्यांनी सोशल नेटवर्किंग साईट्स अर्थात समाजमाध्यमांवर आपला बहुमूल्य वेळ वाया न घालवता अभ्यासावर त्यांचे लक्ष केंद्रित करावे, असे सूचित केले.

डीएलएलईचे क्षेत्रिय समन्वयक व सीकेटी महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. पाटील यांनी सामाजिक व शैक्षणिक सकारात्मक कार्यामुळे समाजात सन्मान मिळेल, असे सांगितले.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य शरदकुमार शहा यांनी केवळ परीक्षेतील गुणांसाठी सहभाग न घेता व्यक्तिमत्त्व व सामाजिक विकासाच्या संधीचा लाभ घेतला पाहिजे, असे सांगितले, तर प्रा. गणेश कदम व प्रा. महेश धायगुडे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकल्पांबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सायली म्हात्रे व मरियम खोलिया यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मीनल मांडवे, प्रा. स्नेहा चोगले, प्रा. डॉ. मेघा जैन, प्रा. रेश्मा ढवळे, विद्यार्थी प्रतिनिधी अभिषेक शिंदे, अक्षिया पारकर आदींनी मेहनत घेतली. संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply