Breaking News

कुंडेवहाळ ग्रा.पं.तर्फे स्त्रीशक्तीचा गौरव

मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचाही सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त

तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी (दि. 14) गौरव स्त्री शक्तीचा-गौरव कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुकन्या समृद्धी योजनेची माहिती व लाभ या कार्यक्रमात देण्यात आला.

या वेळी जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नवीन पनवेल इनरव्हीलच्या अध्यक्षा डॉ. जयश्री पाटील, सरपंच सदाशिव वास्कर, उपसरपंच दत्तात्रय पाटील, ग्रामसेविका स्वप्नाली पोळ, ओवळेचे तंटामुक्त समिती अध्यक्ष अमित गुंजाजी, पारगाव सरपंच अहिल्या नाईक, नंदराज मुंगाजी, तंटामुक्ती अध्यक्ष अमित मुंगाजी, दशरथ म्हात्रे आदी उपस्थित होते. या वेळी जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या स्वखर्चातून उभारलेल्या जय शिवराय व्यायामशाळेचे उद्घाटन झाले. या वेळी 125 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक काढून देण्यात आले, तसेच पुढील पाच वर्षे ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षी अडीच हजार असे पाच वर्षात 12 हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत, ग्रामपंचायतीने मुलींच्या सन्मानासाठी खारीचा वाटा उचलला आहे, अशी माहिती सरपंच सदाशिव वास्कर यांनी या वेळी दिली. मुलीच्या लग्नासाठी सुकन्या योजना व ग्रामपंचायतीने दिलेला निधी उपयुक्त ठरणार आहे. स्त्रीभ्रुणहत्या कुंडेवहाळ ग्रामपंचायतीने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. मुलीच्या जन्मानंतर तिचे स्वागत करण्यासाठी तिच्या नावे पाच हजार रुपये व एक रोप देऊन मुलीचे स्वागत केले जाणार आहे. दोन मुलींसाठी ही योजना सुरू राहणार आहे. असा उपक्रम राबविणारी ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.

या कार्यक्रमात आदर्श माता पुरस्कार अनुसया नकुल भोईर यांना देण्यात आला. अंथरुणावरून उठूही शकत नाही, अशा आपल्या मुलाची त्यांनी 23 वर्षे सेवा केली. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचा गौरव करण्यात आला, तसेच आदर्श पत्नी म्हणून भारती अविनाश वास्कर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी एका व्यसनी मुलाशी विवाह करून बैठकीच्या माध्यमातून त्याचे जीवन घडविले. या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात यश मिळविलेल्या गावातील तरुणांचा, अंगणवाडी सेविकांचा महेश बालदी, अरुणशेठ भगत, डॉ. पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राधा-कृष्ण भजन मंडळाने गावचे नाव राज्यभर पोहोचविणार्‍या मंडळाचा गौरव करण्यात आला, तसेच राधा-कृष्ण मंदिरात नित्यनेमाने हरिपाठ करणार्‍या राधा-कृष्ण हरिपाठ मंडळाचाही या वेळी सत्कार करण्यात आला. राधा-कृष्ण मंदिरात झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत सुंदरपणे प्रीती मिलिंद वास्कर हिने केले. कुळुमाता महिला मंडळ, गावातील महिला, आर. आर. वास्कर सामाजिक विकास मंडळ, ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply