Breaking News

देवघर ग्रामपंचायतीची चौकशी करावी ; ग्रामस्थांचे ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांना साकडे

म्हसळा : प्रतिनिधी

तालुक्यातील देवघर ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार सुरू असून, या ग्रामपंचायतीमध्ये मागील दोन वर्षांत झालेल्या सर्व व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी देवघर गावातील ग्रामस्थांनी म्हसळ्याच्या गटविकास अधिकार्‍यांमार्फत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रोजगार हमी योजनेंतर्गत देवघर ग्रामपंचायत हद्दीत करण्यात येणार्‍या कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, अपूर्ण कामांची सर्व रक्कम अदा करण्यात आली आहे. ढोरजे येथील जि. प. शाळेला 40 हजारांचा प्रोजेक्टर (ज्याची खरी किंमत 30 हजार आहे) देण्यात आले आहे. त्याचे बिल ग्रामपंचायतीने अदा केले आहे, मात्र दोन हजारांच्या डीव्हीडी प्लेयरअभावी गेल्या नऊ महिन्यांपासून प्रोजेक्टर बंद ठेवण्यात आला आहे. 40 हजार रुपये खर्च करूनही विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून अद्याप वंचित आहेत. पथदिवे, झाडे लावा, झाडे जगवा या योजनांमध्येही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे निवेदनात

म्हटले आहे.

सदरचे निवेदन ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे पाठविण्यासाठी देवघर गावातील ग्रामस्थांनी म्हसळ्याचे  गटविकास अधिकारी वाय. एन. प्रभे यांच्याकडे दिले. या वेळी पं. स. सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले तसेच अमित महामुनकर, सूर्यकांत तांबे, सुनील शिंदे, गोविंद पाखड, गोविंद बोर्ले व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply