Breaking News

विजयी हॅट्ट्रिकसाठी आमदार प्रशांत ठाकूर सज्ज

अभूतपूर्व उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त

विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज असलेले पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 3) अभूतपूर्व उत्साहात आपला

उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल केला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, आरपीआयचे कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड प्रांत कार्यालयात उपस्थित होते. विशेष म्हणजे आज शक्तिप्रदर्शन हा विषयच नव्हता, पण हजारो कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने रॅलीत सहभाग घेऊन जल्लोष व ताकद दाखवून दिली.

प्रारंभी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. त्यानंतर पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयापासून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली निघाली. भगव्या-हिरव्या रंगाच्या गाडीवर लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व अन्य प्रमुख नेते विराजमान झाले होते. ही रॅली पंचरत्न सर्कल, टपाल नाका, भाजी मार्केटमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. तेथे शिवरायांच्या पुतळ्याला आणि पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. रॅली पुढे एसटी स्टॅण्ड रस्त्यावरून आदर्श हॉटेल, विरूपाक्ष मंदिर, जयभारत नाका, गोखले हॉल अशी शहरात फिरून प्रांत अधिकारी कार्यालय येथे पोहोचली. तेथे अर्ज दाखल करण्यात आला.

दरम्यान, न्यू महाराष्ट्र हॉटेलजवळ या रॅलीतील गाडीवर पुष्पवृष्टी करण्यात येऊन हार घालण्यात आले. मार्गात अनेक जण येऊन हात मिळवून शुभेच्छा देत होते. मोठ्या संख्येने कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाल्याने रॅली पोहोचायला उशीर होणार असल्याचे पाहून आमदार प्रशांत ठाकूर अखेर गाडीतून उतरून चालत पुढे कार्यालयात गेले. रॅली पोहोचल्यावर अन्य मान्यवरही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कक्षात गेले. तेथे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तेथून बाहेर पडल्यावरही बाजूच्या बिल्डिंगमधील महिलांनी प्रशांतदादांना पंचारतीने ओवाळले. 

मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांना पराभवाची धूळ चारली असून, या वेळेस त्यांना एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांना केला. या कार्यतत्पर लोकप्रतिनिधीने मतदारसंघात केलेली कामे सर्वश्रुत आहेतच, शिवाय लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि दांडगा जनसंपर्क असलेले सर्व समाजाचे प्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आमदार म्हणून ते सातत्याने मोठे योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांना सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत असून, एक लाख मताधिक्क्याचे उद्दिष्ट ते उत्तुंग विकासकामांच्या जोरावर पूर्ण करतील, अशी खात्री पनवेल मतदारसंघातील नागरिक देत आहेत. त्याची झलक विराट जनसमुदायाच्या उपस्थितीतून पाहावयास मिळाली.

उड्डाणपूल, नाट्यगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, उपजिल्हा रुग्णालय, अतिरिक्त जिल्हा न्यायालय, तालुका क्रीडा संकुल अशी महत्त्वपूर्ण कामे करण्याबरोबरच शहरी पट्टा व ग्रामीण भागाचा पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर विकासाचे सुयोग्य संतुलन साधत आहेत. सिडकोचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासह पनवेल महापालिका हद्दीतील विकासकामांसाठी तब्बल 100 कोटी रुपयांचा निधी दिला. आमदार निधी, जिल्हा वार्षिक योजना, तसेच इतर शासकीय निधीच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा झंझावात सर्वत्र पोहोचला आहे. त्यामुळे त्यांना विकासमूर्ती म्हणून ओळखले जाते. असे हे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर तिसर्‍यांदा विजयी होणार आहेत, पण हा विजय एक लाखापेक्षा अधिक मतांच्या फरकाने असावा, अशी संपूर्ण मतदारसंघातील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे कार्यकर्तेही सज्ज झाल्याचे चित्र अर्ज दाखल करताना दिसून आले.

उत्साहाची उन्हावर मात

ऑक्टोबर महिना सुरू झाल्याने उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. असे असले तरी महायुतीचे कार्यकर्ते उन्हातान्हाची पर्वा न करता प्रचंड संख्येने आमदार प्रशांत ठाकूर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. या वेळी त्यांनी ’एकच वादा प्रशांतदादा’, ’प्रशांतदादा आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘कहो दिलसे प्रशांतदादा फिरसे’, ’अब की बार एक लाख पार,’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या. या घोषणांनी पनवेलनगरी दुमदुमून गेली होती. एकूणच आजचे चित्र पाहता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

ये तो सिर्फ झाँकी है  -लोकनेते रामशेठ ठाकूर

या वेळी आपल्या भाषणात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कोण म्हणतो येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही याऐवजी आता येणार म्हणजे येणारच, अशी घोषणा द्या. आज आपण सर्व जण आमदार प्रशांत ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आला आहात. हे काही शक्तिप्रदर्शन नाही. ये तो सिर्फ झाँकी है निकाल अभी बाकी है. त्यादृष्टीने आजपासून सर्वांनी जाहीर प्रचारात सहभागी व्हायचे आहे. अहोरात्र मेहनत घेऊन विधानसभा निवडणुकीत 75 ते 80 टक्के मतदान होईल इतके काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.

सकारात्मकपणे प्रचारकरा : आमदार प्रशांत ठाकूर

स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वप्रथम कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रजा ही राजा मी सेवेकरी या न्यायाने भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख कारभार करीत आहे. अशा स्थितीत आपल्याविरोधात कोणताही ठोस असा मुद्दा विरोधकांकडे नाही. त्यामुळे ते

आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करतील, मात्र कार्यकर्त्यांनी त्याला बळी न पडता आदर्श आचारसंहितेचे पालन करून सकारात्मकपणे प्रचार करावा.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply