शोकसभेत लोकप्रतिनिधी, नागरिकांकडून आदरांजली अर्पण
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या नगरसेविका आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मुग्धा लोंढे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शनिवारी (दि. 5) सायंकाळी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी लोकप्रतिनिधी आणि पनवेलचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी मुग्धाताईंच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्या ऐकून फडके नाट्यगृहातील सर्व लोक हेलावून गेले.
कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी अपघात होऊन झालेला हा मोठा आघात आहे. आपण तेथून येताना दोन मिनिटे त्यांच्याजवळ बोलत उभे राहिलो असतो, तर कदाचित त्या बाजूला झाल्या असत्या आणि प्रसंग टळला असता, असे सांगून चांगली माणसे लवकर का जातात, हे कोडे असल्याचे ते म्हणाले.
रिपाइं (आठवले गट)चे कोकण अध्यक्ष नगरसेवक जगदिश गायकवाड यांनी प्रेमळ लोंढे कुटुंबीयांचे पनवेलकरांवर ऋण असल्याचे सांगितले. मुग्धाताईंचे विचार कायमस्वरूपी जिवंत राहतील, असेही ते म्हणाले.
शेकापचे गणेश कडू यांनी मुग्धाताई आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नसल्याचे सांगून प्रीतीताईंची त्या नेहमी चौकशी करताना तुमची मुले लहान आहेत. तुम्ही कामात व्यस्त असता. त्यांना माझ्याकडून डबा पाठवते, असे म्हणायच्या. त्यांचा छोटा सहवास कायम आठवणीत राहील, असेही त्यांनी नमूद केले.
मुग्धाताईंचे बंधू अमित ओझे यांनी कोणताही अभिनिवेष न बाळगता आपण सगळे येथे आलात हे पाहून ताईचे काम व्यवस्थित होते याची खात्री पटते, असे सांगून त्यांचे आपल्या कुटुंबाकडेही लक्ष होते. प्रत्येक गोष्ट शिकून पुढे जायची तिला सवय होती. पनवेलकरांनी दिलेला आधार आमच्या कुटुंबाला यातून सावरण्याचे बळ देईल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
भारतीय मजदूर संघाचे नाना देसाई म्हणाले की, मुग्धाताईंवर नंदा वझे कुटुंबाचे संस्कार होते. आधी समाजाचे काम, मग स्वत:चे काम या सूत्रानुसार त्यांनी संसार चांगला करून समाजकार्यही केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राकेश फाटक यांनीही या वेळी आदरांजली वाहिली. प्रारंभी संध्या घाडगे यांनी ’पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ ही प्रार्थना म्हटली.
मुग्धाताईंच्या कुटुंबाला वार्यावर सोडणार नाही : लोकनेते रामशेठ ठाकूर
या वेळी श्रद्धांजली वाहताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मन भरून येत असल्याचे नमूद करून मुग्धाताईंचा हसतमुख स्वभाव आणि गोड बोलणे पनवेलकर कदापि विसरणार नाही, असे सांगितले. मुग्धाताईंना शहर अध्यक्षपद देताना आपल्याला वाटलेली शंका त्यांनी आपल्या कामाने कशी दूर केली ते सांगून भारतीय जनता पक्ष त्यांच्या कुटुंबाला वार्यावर सोडणार नाही. महापालिकेच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्येवर जबाबदारी देऊ आणि त्या ती पूर्ण करून आईचा वारसा चालवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्षाचे कधीही न भरून येणारे नुकसान : आमदार प्रशांत ठाकूर
सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुग्धाताईंच्या जाण्यामुळे पक्षाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याचे म्हटले. पक्षाशी समर्पित असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी प्रत्येक कामात आपल्याला मदत केली. स्वत:चे काम समजून झोकून देत काम करणारा सहकारी गमावल्याचे दु:ख मला झाले आहे. निवडणूक अर्ज भरताना त्या आपल्याला ओवाळण्यासाठी उभ्या होत्या, पण अर्ज भरायला उशीर होत असल्याने पुढे निघून गेल्याने त्यांना मला ओवाळता आले नाही याची खंत कायम राहील. त्यांच्या कुटुंबाला दु:खातून सावरण्याची ताकद ईश्वराने द्यावी, अशी प्रार्थनाही त्यांनी या वेळी केली.