Breaking News

राज्यात स्थिर सरकार देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ट्विट; पंतप्रधानांचे मानले आभार

मुंबई : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी ट्विटरद्वारे पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ‘आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, मोदीजी तुमचे खूप खूप आभार,’ असे ट्विट पवारांनी केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचेही आभार मानले आहेत. त्यामुळे पवार हे त्यांच्या बंडावर कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले होते. राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर पवार यांनी रविवारी

(दि. 24) एकापाठोपाठ एक असे अनेक ट्विट करून पंतप्रधानांसह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. ’आम्ही राज्यात स्थिर सरकार देऊ. जनतेच्या कल्याणासाठी कठोर परिश्रम घेऊ. शुभेच्छांबद्दल धन्यवाद,’ असे ट्विट करीत पवार यांनी आभार मानले आहेत.

याचबरोबर अजित पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजप नेते नितीन गडकरी, राजनाथ सिंह, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, सदानंद गौडा, मुख्तार अब्बास नकवी, गजेंद्रसिंह शेखावत, सुरेश प्रभू, गिरीश बापट, मुख्यमंत्री विजय रूपानी, मनसुख मांडविया, रामदास आठवले, अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान, बी. एल. संतोष, रवी किशन, अमृता फडणवीस आदींना टॅग करून त्यांचेही आभार

मानले आहेत.

मी राष्ट्रवादीतच असून, आदरणीय शरद पवारसाहेब हेच आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी मिळून जनतेच्या कल्याणासाठी पुढील पाच वर्षे स्थिर सरकार देऊ. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. सर्व काही आलबेल आहे. फक्त थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यासाठी आभार!

-अजित पवार, उपमुख्यमंत्री

-आज पुन्हा सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील सत्तेसाठी

सर्वोच्च न्यायालयात रविवारी (दि. 24) झालेल्या सुनावणीत दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सोमवारी पुन्हा होणार आहे. तातडीने विधिमंडळात बहुमत सादर करण्याची विरोधकांची मागणी कोर्टाने फेटाळली असून, सरकार स्थापनेबाबतची कागदपत्रे उद्या सकाळी 10.30 वा. सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

या प्रकरणात सरकारच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने कपिल सिब्बल व अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हणणे मांडले. यावर कागदपत्रांचा अभ्यास करून कोर्ट अंतिम निर्णय देणार आहे.

-फडणवीस, पवारांचे भाजपकडून अभिनंदन

मुंबई : भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक वसंत स्मृती कार्यालयात रविवारी झाली. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पीयूष गोयल आदी नेते उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव उपस्थित भाजप आमदारांनी संमत केला.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply