Breaking News

पेब किल्ल्यावरून घसरून ट्रेकर दरीत

सात तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाले जीवदान; सह्याद्री रेस्क्यू टीमची कामगिरी

कर्जत : बातमीदार

विकटगड (पेब) हा किल्ला सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेला आहे. त्यामुळे या किल्ल्यावर भ्रमंतीला ट्रेकर्सची कायम पसंती असते. मंगळवारी पुण्याहून पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या ग्रुपमधील एका तरुणाचा पाय घसरून तो सुमारे 350 फूट खोल दरीत घरंगळत गेला, मात्र सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी प्रयत्नांची शर्थ करून त्या ट्रेकरला  जीवदान दिले आहे. पुण्यातील तरुणांच्या एका ग्रुपने पेब किल्ल्यावर ट्रेकिंगचे आयोजन केले होते. त्यानुसार आर्यन जेकब जॉर्ज, शुभम शहा, अमीन रेहमान (सर्व रा. कोंढवा, पुणे) हे तिघे आपल्या चारचाकी वाहनाने मंगळवारी सकाळी 10 वाजता माथेरान येथे पोहचले. त्यानंतर नाश्ता करून त्यांनी ठरल्याप्रमाणे दस्तुरी येथून किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली, मात्र दुपारच्या सुमारास किल्ल्याजवळील बोरीचा माळ येथे त्यांच्यातील 21 वर्षीय व 130 किलो वजन असलेल्या आर्यन जॉर्ज याचा पाय घसरून तो सुमारे 350 फूट दरीत कोसळला. त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी ही बाब लागलीच माथेरान व नेरळ पोलीस ठाण्याला कळवली. पोलिसांनी माथेरान येथील सह्याद्री रेस्क्यू टीमला पाचारण केले. त्यानुसार टीमचे संदीप कोळी, सुनील कोळी, वैभव नाईक, सुनील ढोले, अमित कोळी, चेतन कळंबे, अक्षय परब, उमेश मोरे यांनी साहित्य सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. त्यांनी रात्रीच्या अंधारात तब्बल सात तास प्रयत्नांची शर्थ करीत आर्यन जॉर्जचा शोध घेतला व दोराच्या साहाय्याने त्याला वर काढले. किरकोळ मार वगळता जॉर्जला मोठी दुखापत झाली नव्हती. दस्तुरी येथे आल्यानंतर खासगी वाहनाने नेरळ येथील डॉ. हेमंत शेवाळे यांच्या धन्वंतरी रुग्णालयात पाठवून जॉर्जवर प्राथमिक उपचार करण्यात आले व त्या तिघांना पुणे येथे रवाना करण्यात आले.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply