मुरूड : प्रतिनिधी
श्री काळभैरव क्रीडा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पांडवादेवी रायवाडी संघाने पुरुषांमध्ये; तर दिलखूष आवास संघाने महिलांमध्ये अजिंक्यपद पटकाविले. पांडवादेवीचा केदार लाल आणि दिलखूषची हर्षदा नाखवा सर्वोत्तम खेळाडू ठरले.
मुरूड येथील श्री काळभैरव मंडळाच्या पटांगणावर झालेल्या पुरुषाच्या अंतिम सामन्यात पांडवादेवी संघाने सिद्धिविनायक मुरूड संघाचा 18-14 असा पराभव करीत श्री काळभैरव चषक व रोख बक्षिसाची कमाई केली. महिला गटात दिलखूष संघाने किल्लेश्वर संघाला 25-24 असे चकवित विजेतापदाचा चषक व रोख बक्षीस प्राप्त केले.
या अगोदर झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यात पांडवादेवी संघाने विठ्ठल कोपरपाडा संघाचा 19-12 असा; तर सिद्धिविनायक मुरूड संघाने कळंबोली संघाचा 20-8 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. दुसरीकडे महिलांमध्ये दिलखुश संघाने प्रतिज्ञा संघावर 25-21 अशी; तर किल्लेश्वर संघाने कर्नाळा स्पोर्ट्सवर 22-17 अशी मात करीत अंतिम फेरीत धडक दिली होती.