Breaking News

दुर्गामाता संघ अजिंक्य

मुंबई : प्रतिनिधी

राज्यस्तरीय कुमार गट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुर्गामाता स्पोर्ट्सने एसएसजी फाऊंडेशनचा 37-34 असा पराभव करीत रोख 21 हजार व स्वप्नसाफल्य चषक आपल्या नावे केला. दुर्गामाता स्पोर्ट्सचा प्रथमेश पालांडे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

मुंबई शहर कुमार गट निवड चाचणी स्पर्धेत याच दोन संघात लढत झाली असता दुर्गामाताने बाजी मारली होती. पुन्हा एकदा बाजी मारत कुमार गटात आपणच किंग हेच दुर्गामाताने सिद्ध केले. उपविजेत्या एसएसजी संघाला चषक व रोख 11 हजारांवर समाधान मानावे लागले. मुंबईतील दोन तूल्यबळ संघात झालेली ही लढत शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरली. पहिल्या डावात दोन्ही संघाने एक-एक लोणची नोंद करीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्गामाताने या डावात मिळविलेले पाच बोनस गुण त्यांच्या कामी आले. त्यामुळे विश्रांतीला दुर्गामाताकडे 21-18 अशी आघाडी होती.

दुसर्‍या डावातदेखील दुर्गामाताने बोनस रेषा पार करण्यावर भर देत सात बोनस गुणांची कमाई केली. एसएसजीला पूर्ण डावात अवघा एक बोनस गुण मिळविता आला. हा बोनस गुणांतील फरकच शेवटी या विजयात महत्त्वाचा ठरला.

करण कदमचा झंजावाती अष्टपैलू खेळ त्याला प्रथमेश पालांडेने चढाईत गडी टिपत दिलेली उत्कृष्ट साथ यामुळे दुर्गामाताला हा विजय मिळविता आला. एसएसजीच्या पंकज मोहिते, ओमकार पोरे यांनी कडवी लढत दिली, पण बोनस गुण मिळविण्यात आलेले अपयश या संघाच्या पराभवास कारणीभूत ठरले.

या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात दुर्गामाताने श्रीराम संघाला 37-15 असे; तर एसएसजी फाऊंडेशनने सह्याद्री मित्र मंडळाला 43-39 असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती.

Check Also

स्वप्नपूर्ती!

भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित …

Leave a Reply