Breaking News

कोरोनाचा रुग्ण असल्याची अफवा पसरवल्याने पत्रकारावर गुन्हा

कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील कळंब येथील गरुडपाडा गावात नवरा बायको यांच्या भांडणाला चुकीच्या माहितीच्याआधारे कोरोनाकडे ओढले व जमावबंदीचा आदेश मोडल्याने नेरळ पोलीस ठाण्यात एका पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आद्यदेश आणि संचारबंदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

कळंब जवळील गरुडपाडा येथे असलेल्या भागा गोविंद बदे आणि सुरेखा भागा बदे यांची मुलगी अपर्णा ही जुन्नर येथे लग्नानंतर राहते. मात्र आपल्या नातेवाइकाचे निधन झाले म्हणून ती आपल्या माहेरी कळंब येथे घरी आली होती. मात्र दीड महिना झाला तरी आपली पत्नी घरी येत नाही म्हणून सुनील हरिभाऊ वरपे हे जुन्नर येथून 25 मार्च रोजी सकाळी कळंब येथे पोहचले. तेथे आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला आपण जुन्नरला जाण्यासाठी निघू असे सांगत होता. मात्र अपर्णा या नवर्‍याचे काही ऐकून घेत नव्हत्या. त्यामुळे सुनील वरपे याने सासू सासरे आणि पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या तिघांनी सुनील वरपे यांना पकडून दोरीने बांधून ठेवले. ही माहिती स्थानिक माहितीगाराकडून नेरळ येथे राहणारे खासगी वाहिनीचे पत्रकार यांना सांगितल्यावर त्यांनी गरुडपाडा गाव गाठले. तेथे भागा बदे यांच्या अंगणात एका व्यक्तीला बांधून ठेवले असल्याचे चित्रण केले आणि आपल्या खासगी वाहिनीवर बातमी ब्रेक केली. त्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णाला दोरखंडाने बांधून ठेवले असल्याचा उल्लेख होता.

त्यानंतर प्रशासनाचे वतीने नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जी. के.  भालचिम, सचिन सांगळे कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक हे गरुडपाडा गावात पोहचले. त्यावेळी दोरीने बांधून ठेवलेल्या सुनील वरपे तसेच भागा बदे, सुरेखा बदे आणि अपर्णा वरपे यांची तपासणी केली असता कोणालाही कोरोना सदृश अशी लक्षणे आढळली नाहीत. परंतु त्या खासगी वाहिनीवरील बातमीने सर्वत्र खळबळ माजली होती. पोलीसांनी त्या बातमीची खातरजमा केली. संबंधित पत्रकाराने स्पर्धा करण्यासाठी ती बातमी कोरोना स्वरूप देत ब्रेक केल्याने बनवून व्हायरल केली त्यामुळे रात्री नेरळ पोलीस ठाण्यात प्रशासनाचे वतीने चुकीच्या माहितीच्या आधारे बातमी बनविणारे पत्रकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

कोणत्याही बाबींची खात्री करावी अशी सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना घराबाहेर पडणे आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याने हे कारवाई करण्यात आली आहे.

– अविनाश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply