Breaking News

कसोटीत संयम महत्त्वाचा

हल्लीच्या धावत्या युगात सर्वांना सर्वकाही झटपट होणे अपेक्षित असते. त्याला खेळही अपवाद राहिलेले नाहीत. दर्शकांना कमी वेळेत निकाल हवा असतो. त्यामुळे लीग प्रकाराला चांगलीच पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे, पण पूर्वी कसोटी क्रिकेट लोकप्रिय होते. त्यात संयम महत्त्वाचा ठरत असे. आताही माणूस एका वेगळ्या कसोटीवर आहे ती म्हणजे जीवनाची…

कोरोना विषाणूने एव्हाना जगाला विळखा घातला आहे. चीनमधून प्रादुर्भाव झालेल्या या महामारीने अनेक देशांमध्ये कहर केला आहे. युरोपातील इटलीत तर दर दिवसाला सातशे-आठशेहून अधिक लोकांचा बळी जातोय. महासत्ता अमेरिकेनेही कोरोनापुढे हात टेकले आहेत. संपूर्ण जग सध्या कोरोनामुळे त्रस्त आणि ठप्प झाल्याचे विदारक चित्र आहे. आपल्या देशातही सुरक्षिततेच्या दृष्टीने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा व त्यामुळे होणार्‍या मृत्यूचा आकडा इतर देशांच्या तुलनेत जास्त नसला तरी काळजी न घेतल्यावर काय होते हे इटलीकडे पाहिल्यावर स्पष्ट होते. इंग्रजीत एक म्हण आहे ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’. म्हणजेच रोग होण्याआधी प्रतिबंध केलेला चांगला. खरंच आरोग्य सुदृढ असणे महत्त्वपूर्ण असते. आपली शरीरसंपदा निरोगी असेल, तर आपण पूर्ण क्षमतेने काम करून ध्येय गाठू शकतो. दुसरीकडे आरोग्य निरामय नसेल तर मर्यादा येतात. म्हणूनच कोरोनाचा कहर पाहता आपण वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित असणे आवश्यक आहे. देशात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. संचारबंदी लागू असल्याने अनेकांना घराबाहेर पडणे मुश्किल होत आहे. त्यामुळे करायचे काय, असा प्रश्न पडला आहे. एरवी स्पर्धेच्या व धकाधकीच्या जीवनात जो तो धावत असतो. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ही दैनंदिन धावपळ असते. आता मात्र या सार्‍याला ‘ब्रेक’ लागला आहे. अशी स्वस्थ बसण्याची सवय नसल्याने अनेकांना अवघड जात आहे. शिवाय भविष्याची चिंताही सतावत आहे, परंतु सध्याच्या घडीला प्रथमत: आलेल्या संकटावर मात करणे गरजेचे आहे. ‘सिर सलामत तो पगडी पचास’प्रमाणे आपण जर या आपत्तीतून सहीसलामत बाहेर पडलो, तर झालेले नुकसान नंतर नक्कीच भरून काढू शकतो. म्हणून आणखी काही दिवस घराबाहेर न पडता स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. काही मंडळी घरातून काम करीत आहेत. त्यांनी उरलेला वेळ परिवारासाठी द्यावा. जेव्हा परिस्थिती साधारण असते तेव्हा प्रत्येक जण व्यस्त असतो. त्या वेळी कुटुंबाकडे लक्ष देणे, आई-वडील, पत्नी, मुलांसोबत राहणे शक्य होत नाही. ते लक्षात घेता आपल्या लोकांसोबत राहण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. यादरम्यान स्वच्छतेविषयक दक्ष राहणे, तसेच बाहेरील व्यक्तिंपासून संसर्ग टाळण्यासाठी सतर्क राहणे जरुरीचे आहे. खरं तर नियतीपुढे माणूस काहीच करू शकत नाही. मानवाने विज्ञान-तंत्रज्ञानाद्वारे प्रगती केली. जीवन सुकर केले, मात्र चालू स्थितीत निर्माण झालेल्या असाध्य संसर्गावर मात करणे संपूर्ण जगाला अवघड जात आहे. मी मी करून मिरवणारा माणूसप्राणी हतबल झाला आहे. हे वळण आवश्यकच होते. आपण काहीही करू शकतो अशी मानसिकता मानवामध्ये दिसून येत होती. ती पूर्णत: ठेचली गेली आहे. हा सर्वांसाठी एक धडा आहे. त्यातून सर्व जण बोध घेतीलच, परंतु सद्यस्थितीत या अरिष्टामधून बाहेर पडण्यासाठी संयम ठेवणे प्रत्येकाच्या हिताचे आणि अनिवार्यही आहे.

Check Also

उरणमधील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखोंचा गैरव्यवहार करणार्‍या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

उरण : प्रतिनिधीउरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखों रुपयांचा अपहारप्रकरणी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्याविरोधात उरण …

Leave a Reply