राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्राचा पुरुष संघ बाद फेरीत; महिला संघ मात्र साखळीतच गारद

मुंबई : प्रतिनिधी

जयपूर राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने पूर्णिमा विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 67व्या वरिष्ठ पुरुष व महिला गट राष्ट्रीय स्पर्धेच्या पुरुषांच्या क गटात महाराष्ट्राने दुबळ्या मणिपूरचा 46-17 असा पराभव करीत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. दुसरीकडे महिलांच्या अ गटात महाराष्ट्राचे आव्हान मात्र तामिळनाडूने 26-21 असे संपुष्टात आणले.

रेल्वेला चुरशीची लढत देत अवघ्या एका गुणाने पराभूत होणार्‍या महाराष्ट्राच्या महिला संघाला तामिळनाडूनेही पराभवाचा धक्का दिल्याने सलग दुसर्‍या वर्षी बाद फेरी गाठण्यात अपयश आले. सावध सुरुवात करीत मध्यांतराला 9-9 अशा बरोबरीत असणार्‍या महाराष्ट्राने मध्यांतरानंतर खेळात थोडी आक्रमता आणीत तामिळनाडूवर लोण देत 14-9 अशी आघाडी घेण्यात यश मिळविले, पण हे यश क्षणभंगुर ठरले. तामिळनाडूच्या चढाईपटूने काही वेळातच महाराष्ट्राचे तीन खेळाडू बाद करीत सामन्यात चुरस निर्माण केली. सामना संपायला शेवटची तीन मिनिटे असताना महाराष्ट्रावर लोण देत तामिळनाडूने 23-18 अशी पाच गुणांची आघाडी घेतली. हीच आघाडी कायम राखत बाद फेरीतील आपला मार्ग मोकळा केला. महाराष्ट्राची सोनाली हेळवी एकाकी लढली. शेवटच्या काही मिनिटांत एकाच चढाईत गेलेले तीन गडी महाराष्ट्राला पराभवाच्या गर्तेत घेऊन गेले.

त्आधी महिलांच्या सामन्यात रेल्वेने महाराष्ट्राला 33-32 असे चकविले. पूर्वार्धात लोण देत 19-15 अशी आघाडी घेणार्‍या रेल्वेला उत्तरार्धात महाराष्ट्राने कडवी लढत दिली. उत्तरार्धात महाराष्ट्राने रेल्वेवर लोण देत आघाडी घेतली होती, पण रेल्वेच्या सोनाली शिंगटेने तीन गडी टिपत रेल्वेला आघाडीवर नेले. महाराष्ट्राकडून सोनाली हेळवी, अंकिता जगताप, पूजा शेलार यांनी कडवी लढत दिली. ही लढत महाराष्ट्राच्या दोन सोनालींमध्ये झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.पुरुषांच्या क गटात महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात करीत सुरुवातीला मणिपूरला दोन लोण देत 25-7 अशी भक्कम आघाडी घेतली. मध्यांतराला 32-9 अशी आघाडी महाराष्ट्राकडे होती. मध्यांतरानंतर आणखी एक लोण देत ही आघाडी 41-16 अशी वाढविली. शेवटी 29 गुणांनी महाराष्ट्राने सामना जिंकला. तुषार पाटील, अजिंक्य पवार यांच्या पल्लेदार चढाया, तर रोहित बने, शुभम शिंदेच्या भक्कम पकडीच्या जोरावर महाराष्ट्राने हा विजय साकारला.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply