पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील गैरव्यवहाराचा आघाडीने तपास करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश रघुवीर गोवेकर यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शेकापच्या नेत्या आणि पनवेलच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा ठोकळ यांचे मेहुणे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद बाबू चव्हाण यांची नियुक्ती झाल्यामुळे कर्नाळा बँकेतील गैरव्यवहाराचे तपासकाम थंड्या बस्त्यात जाईल की काय, अशी शंका पनवेलकर व्यक्त करीत आहेत.
सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण हे यापूर्वी पनवेल शहरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करीत होते. त्यांना साधारणत: सात महिन्यांपूर्वी पदोन्नती मिळून ते मुंबई लोहमार्ग विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले होते, मात्र त्यानंतर लगेचच त्यांची तेथून बदली करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
एसीपी विनोद चव्हाण यांची पत्नी रेणुका चव्हाण याही पोलीस दलात असून त्या अमरावती येथे जातपडताळणी विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. शेकापच्या ज्येष्ठ नेत्या आणि पनवेलच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा ठोकळ यांच्या रेणुका विनोद चव्हाण या सख्ख्या भगिनी आहेत. कर्नाळा बँकेच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीवर या नातेसंबंधांचा विपरीत परिणाम तर होणार नाही, अशी शंका पनवेलमधील जागरूक नागरिक व्यक्त करीत आहेत.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराची मालिका यापूर्वी दै. रामप्रहरने प्रकाशित केली होती. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला वेगही आला होता. या वेगाला या नातेसंबंधांमुळे खीळ बसते की काय, अशीही शंका पनवेलकर व्यक्त करीत आहेत.
आश्चर्याची बाब अशी की, सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती मिळून मुंबई लोहमार्ग विभागात बदली झालेल्या विनोद चव्हाण यांची त्यानंतर केवळ सात महिन्यांतच पुन्हा नवी मुंबईतच कशी बदली झाली याबाबत शंका व्यक्त होत आहे. नवी मुंबईचे कर्तव्यकठोर पोलीस आयुक्त संजय कुमार असतानाही अशी नियमबाह्य बदली करण्यात आल्याने त्यामागे काही राजकीय हितसंबंध गुंतले आहेत की काय, अशी शंकाही पनवेलकरांकडून व्यक्त होत आहे.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper