पनवेल : वार्ताहर – कोरोना साथीचा आजार हा संपूर्ण जगामध्ये थैमान घालत आहे. हा रोग पसरू नये यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या व दिवसेंदिवस वाढत जाणार्या लॉकडाऊनमुळे अनेकांची कामे बंद पडून काही कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पनवेलमधील श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट व पत्रकार मित्र असोसिएशन हि संस्था आजपर्यंत स्वखर्चाने शक्य तितक्या अत्यंत गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करीत आहे.
नवीन पनवेल येथील पंचशील नगर येथील काही रहिवाशांना जीवनाश्यक वस्तूंची गरज असल्याची माहिती तेथील सामाजिक कार्यकर्ते सचिन वायदंडे यांच्याकडून मिळताच श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. मनोहर सचदेव व पत्रकारांनी त्या ठिकाणी जावून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी पत्रकार संजय कदम यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सचिन वायदंडे, श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे उपाध्यक्ष उमेश सचदेव, सेक्रेटरी मनोज देढिया, खजिनदार गोपाळ गिडवानी, पत्रकार मयुर तांबडे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे तालुक्यातील नेरे भागात असलेल्या महालक्ष्मी नगर परिसरात घरकाम करणार्या माता भगिनींना सुद्धा जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्याची माहिती पत्रकार मयुर तांबडे यांनी संस्थेला दिल्यावर महालक्ष्मी नगर येथे जावून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.