Breaking News

‘उबाठा’च्या उरण विधानसभा संघटक प्रीती कडव भाजपमध्ये

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
गव्हाण जिल्हा परिषद तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराला वेग आला असून 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये साउथ इंडियन समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत मान्यवरांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. दरम्यान, या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उरण विधानसभा संघटक प्रीती कडव यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.
या बैठकीस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, भाजप नेते रविशेठ पाटील, निलेश खारकर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, दक्षिण भारतीय मंडळी उपस्थित होती.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की, भारतीय जनता पक्ष सबका साथ, सबका विकास या तत्त्वावर काम करतो. त्यामुळे या परिसरात नव्याने स्थायिक झालेल्या सर्व नागरिकांचाही समतोल विकास महायुती साधेल. नागरिकांनी विकासाला मत द्यावेे.
आमदार महेश बालदी यांनी उलवे नोड परिसरात भाजप महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीत दिलेले रेल्वे फेर्‍या वाढवण्याचे आश्वासन आपण पूर्ण केल्याचे नमूद करत पुढील काळात येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे व पनवेल येथे थेट रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अधिकाधिक विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी, पनवेल महापालिका निवडणुकीत लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीने विकासकामांच्या जोरावर मोठा विजय मिळवला आहे. असाच विजय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही मिळवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, असे नमूद केले.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply