Breaking News

मनोहरभाई अमर रहें!

पणजी : वृत्तसंस्था

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर सोमवारी (दि. 18) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मिरामार बीचवर पर्रिकर यांच्या पार्थिवाला त्यांच्या पुत्राने मंत्राग्नी दिला. या वेळी मनोहर भाई अमर रहें अशा घोषणा देण्यात आल्या.

मनोहर पर्रिकर गेल्या काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते. अमेरिकेतही अनेकदा त्यांच्यावर उपचार करण्यात आले, मात्र गेल्या महिन्यापासून ते अत्यवस्थ होते. अखेर डोनापावला येथील निवासस्थानी रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि कुटुंबीय आहेत.

पर्रिकरांचे पार्थिव सोमवारी आधी भाजपच्या कार्यालयात आणि नंतर दुपारी कला अकादमीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, निर्मला सीतारमण, स्मृती इराणी, रामदास आठवले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी 5च्या सुमारास पर्रिकरांची अंत्ययात्रा निघाली. तीत लोक मोठ्या संख्येने सहभागी झाला होते. मिरामार येथील समुद्रकिनार्‍यावरील मैदानावर पर्रिकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराकडून त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.

या वेळी प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते. साधी राहणी आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या मनोहर पर्रिकर यांच्या जाण्याने सारेच हळहळल्याचे दिसून आले.

मनोहर पर्रिकर हे देशभक्त आणि कुशल प्रशासक होते. सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत असे. त्यांची देशसेवा अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंब आणि समर्थकांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply