Breaking News

राज्यात काळी दिवाळी

तमसो मा ज्योतिर्गमय अर्थात अंधाराकडून प्रकाशाकडे असा तेजोमय संदेश देणारा दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. सर्वत्र त्यासाठी जोरदार तयारी केली जात असताना महाराष्ट्रात मात्र शेतकरी, एसटी कर्मचार्‍यांसह विविध घटकांच्या समस्या आजही जैसे थे आहेत. त्यामुळे त्यांनी दीपावली कशी साजरी करावी, हा प्रश्नच आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्याची पुरती वाट लागली आहे. यांचा पायगुणच इतका वाईट आहे की मराठा आणि ओबीसी आरक्षणावर गंडांतर आले. न्यायालयाचे निमित्त झाले, पण ही आरक्षणे जाण्यामागे राज्य सरकारचा नाकर्तेपणा आणि उदासिनता कारणीभूत आहे हे वेगळे सांगायला नको. राज्यात एकीकडे वादळे, अतिवृष्टी, महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांनी लोक बेजार झाले असताना दुसरीकडे वेळोवेळी होणार्‍या घोटाळे, गैरव्यवहार, खंडणी वसुली, अत्याचार, गुन्हे यांच्या मालिकेने राज्यकर्त्यांनी आम जनतेच्या नाकी नऊ आणलेत. यातून राज्य पुरते बदनामही झाले. राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या रूपाने मंत्रिमंडळातील पहिली विकेट पडली. राठोड यांनी केलेल्या शारीरिक अत्याचारांनी त्रस्त झालेल्या पूजा चव्हाण या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली असली तरी यात राठोड यांचा हात असल्याचे दर्शविणार्‍या अनेक गोष्टी समोर आल्या. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा घेत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र एक प्रकरण क्षमते तोच दुसरे समोर आले ते म्हणजे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचे. ज्यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी असते त्यांनीच त्यांनी पोलिसांना देशाची आर्थिक आणि राज्याची मुख्य राजधानी मुंबईतून दर महिन्याला 100 कोटींची खंडणी वसुली करण्यास सांगितले होते. पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हा गौप्यस्फोट केला. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात देशमुख यांची मंत्रिपदावरून गच्छंती झाली. तेव्हापासून ते गायब आहेत ते आजपर्यंत. राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री आणि नेते धनंजय मुंडे यांचे पहिल्या पत्नीचे तसेच मेव्हुणीवरील बलात्काराचे प्रकरण उजेडात आले. ते दडपण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे, पण भविष्यात त्यांना ते जड जाणार हे नक्की, तर शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी वसुलीप्रकरणी संशयाची सुई आहे. याशिवाय महाविकास आघाडीचे अनेक लोकप्रतिनिधी, मंत्री हे सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि इतर यंत्रणांच्या रडारवर आहेत. जिकडे पहावे तिकडे यांनी नुसता घोळ घालून ठेवला आहे. राज्यात यंदा वादळे, अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. व्यापारी, दुकानदार यांचेही मोठे नुकसान झाले. त्यांच्यासाठी या सरकारकडून वेळोवेळी घोषणा करण्यात आल्या, मात्र सर्वसामान्यांपर्यंत मदत काही पोहचली नाही. उलट शेतकरी, कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम यांनी केले. शेतकरीवर्ग आजही हलाखीत जीवन जगतोय, तर आता एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्येचेही प्रमाण वाढल्याचे दिसून येते. एकूणच कोणताही घटक सुखी नाही किंबहुना त्रस्त असल्याचे दिसून येते. म्हणूनच राज्यातील यंदाची दिवाळी ही काळी असेल आणि याला राज्य सरकार जबाबदार आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply