Breaking News

2026 : मल्टीप्लेक्स फोर डी, व्हीएफएक्स आणि एआयचे

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (अर्थात एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ताचा वाढता प्रभाव आज आपण सोशल मीडियापासून नवीन चित्रपटापर्यत पाहतोय. कोणता फोटो खरा नि कोणता एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातील आहे हे ओळखणे एक नवीन काम झाले आहे. बाहुबली ,पुष्पा, कांतारा, बाहुबली 2, निमल, धुरंदर या चित्रपटातील व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या वापराला रसिकांची मिळालेली सुपरहिट दाद, विशेष उल्लेखनीय गोष्ट काही मल्टीप्लेक्समध्ये फोर डी या तंत्रज्ञानाचा आपल्याला वेगळाच आनंद मिळतो.
पडद्यावरील दृश्यानुसार आपलीही ऐशआरामी प्रशस्त खुर्ची हलते, फिरते. चित्रपट एन्जॉय करणं आता फक्त आणि फक्त पडद्यावरील गोष्टीपुरते राहिलेले नाही. आता तोच चित्रपट मल्टीप्लेक्समधील वातावरणात जाणवतो. अर्थात, चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना, त्यावरची बंदिस्त पटकथा, जोरदार संवाद (घायल हू इसलिए घातक हू), अफलातून कला दिग्दर्शन, उच्च दर्जाचे छायाचित्रण, कौशल्यपूर्ण संकलन, व्यक्तीरेखेनुसार वेशभूषा रंगभूषा, फोकस पूर्वप्रसिद्धी हे सगळे महत्त्वाचं आहेच, पण हे सगळे मल्टीप्लेक्सच्या आलिशान संस्कृतीत अनुभवणे हा नवीन युगातील नवीन चित्रपट आहे. आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात डोकावताना बोलपटावर फोकस टाकताना अर्देशीर इराणी दिग्दर्शित आलम आरा (1931) ते रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले (1975) असा एक टप्पा मानला जातो. आणि ते सामाजिक सांस्कृतिक माध्यमदृष्ट्याबरोबरच आहे, कारण ‘शोले’नंतरचा हिंदी चित्रपटाचा प्रवास आणि प्रभाव हा अनेक वळणावळणाचा, चढ उताराचा आणि आव्हानात्मक आहे. त्यातही राजश्री प्रॉडक्शन निर्मित व सुरजकुमार बडजात्या दिग्दर्शित हम आपके है कौन (1994) आणि यशराज फिल्म्स निर्मित व आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनियाँ ले जायेगे (1995)पासून हा प्रवास आणखी एक भारी वळण घेणारा ठरला.
नवीन शतकातील पहिल्या दशकात आपल्या देशात मल्टीप्लेक्स कल्चर, मोबाईल या गोष्टी रूजल्या. तसा चित्रपटाचा प्रवासही बदलत बदलत गेला. समाजातील खालच्या माणसापर्यंत पोहचलेल्या चित्रपटांवर फोकस कायम राहतानाच मल्टीप्लेक्स युगात महागड्या तिकीट दराने चित्रपट (आता त्याला मुव्ही म्हणतात) ही नवश्रीमंत व उच्चभ्रू समाजातील आवडनिवड झाली. हा क्लास चित्रपटापेक्षा समोसा पॉपकॉर्न आणि शीतपेये यांचा आस्वाद घेत घेत पडद्यावर पाहतो. आज सोशल मीडियातून चित्रपट आणि चित्रपटसृष्टीवर मोठ्याच प्रमाणावर भाष्य केले जातेय. चित्रपटप्रेमींना त्यामुळे मतस्वातंत्र्य मिळाले आहे, हादेखील एक बदलच.
शोले ते निमल आणि पुढे असा आता याच हिंदी चित्रपटाचा प्रवास सुरू झाला आहे असे नवीन समीकरण आहे.
चित्रपट माध्यम म्हणजे अनेक प्रकारच्या कला आणि तंत्रज्ञान यांची सांगड या व्याख्येने सतत बदलत्या आणि नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत करत वाटचाल सुरू ठेवली आहे. हा अभ्यासाचा विषय आहे. चित्रपटसृष्टीत किस्से, कथा, दंतकथा, गॉसिप, गोष्टी, योगायोगाच्या गोष्टी यापलिकडे जाऊन हे विश्व आहे. या विस्तारत आणखीन एक अत्याधुनिक पाऊल म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता (अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स).
चित्रपटाने सोळा एमएमचा पडदा, पस्तीस एम एम ते सिनेमास्कोप तसेच सत्तर एम.एमचा पडदा, त्रि मिती (थ्री डी, अर्थात वेगळा चष्मा लावून) अशी एकीकडे प्रगती करतानाच एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स ते मल्टीप्लेक्स, मोबाईल स्क्रीन ओटीटी असाही प्रवास केला आणि तो त्या त्या काळातील चित्रपट रसिकांनी ते स्वीकारले. आपल्या देशात चित्रपट व क्रिकेट या गोष्टीनी जनसामान्यांचे भावविश्व समृद्ध केले. अनेकांचा तो भावनिक समाधान देणारा विषय आहे. चित्रपट आणि क्रिकेट हे समजायला, पहायला, बोलायला, ऐकायला फार फार सोपा विषय मानला जातो. प्रत्यक्षात मात्र तसं नाही. दोन्हीत बुद्धीमत्ता, मेहनत, डावपेच या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
चित्रपट , वेबसिरीज या माध्यमातून कृत्रिम बुद्धीमत्तेचेही रूजणे आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी स्वीकारले आहे, त्याच वेळेस आधुनिक तंत्रज्ञानाच्या आक्रमणापेक्षा आपला रसिक पारंपरिक चौकटीतील चित्रपट, मालिका, वेबसिरीज यात गोष्टीला जास्त प्राधान्य देईल असाही एक विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या प्रभावात कायमच उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. चित्रपट माध्यम आणि व्यवसाय आपल्या देशात रूजला तेव्हाही रंगभूमीचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित केला गेला होताच, पण तांत्रिक प्रगती होतच राहणार. माणसाच्या शोध घेण्याच्या वृत्तीचे ते प्रतिक आहे.
चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्समध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर होता होता तो मग एखाद्या व्यक्तीरेखेला आजच्या वयाच्या तुलनेत कमी वयाचे दाखवण्यात त्याचा वापर होऊ लागला. आतापर्यंत एखाद्या व्यक्तिरेखेचे तारुण्यात पदार्पण करतानाचे रूपडे दाखवताना अन्य एखाद्या कलाकाराची निवड होई. ते स्वाभाविक होतेच, पण आता कृत्रिम बुद्धीमत्तेने तोच आजच्या वयातील कलाकार त्याच्या मागील वयातीलही दाखवता येऊ लागला आहे.
’फॅन’ या चित्रपटात शाहरूख खानच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास दाखवताना कृत्रिम बुद्धीमत्तेचा अतिशय हुशारीने वापर करण्यात आले. चित्रपट तंत्राच्या बाबतीत स्पेशल इफेक्ट्सच्या जोडीला कृत्रिम बुद्धीमत्ता असे मानले जाते अथवा तसा वापर करण्यात येतो. शाहरूख खानचीच भूमिका असलेल्या जवान व पठाण या चित्रपटात त्याचा भरपूर वापर करण्यात आला आणि या चित्रपटांना जगभरातील चित्रपट रसिकांनी स्वीकारले याचाच अर्थ त्यांना रूपेरी पडद्यावरील व्हिज्युअल स्पेशल इफेक्ट्स व कृत्रिम बुद्धीमत्ता यांचा वापर मान्य आहे. बी. उन्नीकृष्णन दिग्दर्शित एका मल्याळम भाषेतील चित्रपटात माम्मूटी आयुष्यातील चार विविध टप्प्यावरील दाखवण्यात येत असून त्यातील त्याचे तीस वर्षांचा असतानाचे रूपडे याच कृत्रिम बुद्धीमत्तेने दाखवण्यात येणार असून याबाबत माम्मूटीनेही परवानगी दिली आहे. सध्या माम्मूटी बहात्तर वर्षांचा आहे.
दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटातून अतिशय मोठ्याच प्रमाणावर व्हिज्युअल स्पेशल इफेक्ट्स आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांचा वापर करण्यात येत आहे. पॅन इंडिया चित्रपट युगात एका भाषेतील चित्रपट अन्य भाषेत डब करून ते अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याच्या व्यावसायिक कार्यविस्तारात दक्षिणेकडील चित्रपटसृष्टी सध्या आघाडीवर असल्याचे दिसते. अधिकाधिक खर्चाचा चित्रपट, त्याची पडदाभर मांडणी, भरपूर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि दणक्यात चित्रपट प्रदर्शित करणे यातील त्यांच्या धमाकेदार वाटचालीत अनेक चित्रपटांत आता कृत्रिम बुद्धीमत्ता दिसेल. तेथील डी कल्ट स्टुडिओत यासाठीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. आणि तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम भाषेतील चित्रपट निर्माता व दिग्दर्शकांनी त्याचे स्वागत केले आहे. कासारगोल्ड या चित्रपटात या कृत्रिम बुद्धीमत्तेचा भरपूर वापर करण्यात आला आहे. कल्की 2898 एडी हा चित्रपट या तंत्रज्ञानाचे उत्तम सादरीकरण करणारा म्हणून ओळखला जातो.
संगणकावर कलाकाराच्या चेहर्‍यावरचे अनेक तांत्रिक प्रयोग, त्याचा चित्रपटात वापर, अनेक साहसी दृश्यात संगणकावर करामती आणि त्याला मूर्त रूप अशी बरीच कारागिरी या आधुनिक तंत्रज्ञानात रूळलीय. स्टोरी टेलिंग ते चित्रपट प्रसिद्धी यातही याचा वापर होतोय. संगणकाचे विश्व खूपच मोठे आहे आणि कृत्रिम बुध्दिमत्तेत बरेच काही करण्याची संधी आहे. त्यामुळे या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास भरपूर संधी (वा स्कोप) देतील अशा साहसी तसेच अगदी फॅण्टसी गोष्टीही आता मोठ्याच प्रमाणावर चित्रपटात दिसतील. यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी चित्रपट नेणार का अथवा त्यात दिग्दर्शकाच्या कल्पकतेला वाव तो किती असे अनेक प्रश्न बाजूला पडत जातील की दिग्दर्शकाला या कृत्रिम बुद्धीमत्तेचा कल्पकतेने उपयोग करावासा वाटेल, तशी कथा पटकथा त्याला हवीशी वाटेल हेदेखील महत्वाचे आहे. ओटीटी युगात तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहेच. अशा कृत्रिम बुद्धीमत्तेचा पुरेपूर वापर करणारा सॅम भट्टाचार्य दिग्दर्शित ’आयरा’ (2024) या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. ट्वेन्थी सेन्चुरी फॉक्सचा सायफाय रहस्यरंजक चित्रपट ’मॉर्गन’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आदर्श चित्रपट म्हणून ओळखला जातो. नवं नवं ते हवं हवं अशी भूमिका ठेवल्यास हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पडद्यावरील रूप एका वेगळ्याच विश्वात रममाण करण्यात यशस्वी ठरते.
अनेक अ‍ॅनिमेशन चित्रपट या तंत्रज्ञानाने प्रभावित ठरलेत. मल्टीप्लेक्स युगातील मोठा पडदा आणि स्टीरीओफोनिक साऊंड सिस्टीम याला पूरक अशी ही वाटचाल आहे. एखाद्या विशिष्ट कालखंडावरील चित्रपट, चरित्रपट यांच्यासाठी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरतेय. या तंत्रज्ञानाचा वापर व विस्तार कल्पनेपलिकडचा आहे.
मराठीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा ’दि एआय धर्मा स्टोरी’ या चित्रपटात एका वडिलांची आणि मुलीची ही गोष्ट आहे. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या वडिलांची ही गोष्ट आहे. हॉलीवूडमध्येप्रमाणे अ‍ॅक्शन सिक्वेन्स या चित्रपटात पहायला मिळतात. मराठी चित्रपट आधुनिक तंत्रज्ञानात मागे नाही.
तांत्रिक प्रगतीचे काही दुष्परिणाम वा दुरूपयोगदेखील पहायला मिळतात. याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून रक्षिता मंदाना, आलिया भट्ट यांचे डिकफेक व्हिडिओ करण्यात झाला. सायबर क्राईमचे हे अतिशय धोकादायक पाऊल. याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवाजवी गैरवापर रूपेरी पडद्यावर होऊ नये नि भलतेच काही दाखवू नये इतकीच अपेक्षा.
नवीन तंत्रज्ञानाचा सर्वाधिक प्रभाव मनोरंजन क्षेत्रात दिसतोय, म्हणून तर लाईव्ह माध्यम म्हणून रंगभूमीकडे अधिक प्रमाणात वळूयात असं मत काहींनी व्यक्त केले आणि त्यानुसार अनेक मराठी सेलिब्रिटीजनी नाटकाच्या तालमी सुरूदेखील केल्या. खरंतर ज्या मराठी चित्रपटसृष्टीने आपल्याला भरभरून दान दिले त्या मराठी चित्रपटसृष्टीसोबत आपण आव्हानात्मक स्थितीत अथवा अडचणीच्या काळात राहणं आवश्यक आहे असे या सेलिब्रिटीजना का वाटलं नसावं?
नवीन वर्षात मोठा चित्रपट (किमान साडेतीन तास) मोठा स्क्रीन (अर्थात मल्टीप्लेक्समध्ये) आणि याच मसालेदार मनोरंजक चित्रपटात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा भरपूर वापर असणार. एका नवीन युगाची ही सुरुवात आहे…

  • दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply