Breaking News

सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे मोडकळीस

शासनाचे दुर्लक्ष

खारघर : प्रतिनिधी

यंदा पावसाळ्यात वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात झाडे, विजेचे खांब उन्मळून खाली पडल्याने मोठ्या प्रमाणात गाड्यांचे नुकसान झाले आहे. सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असताना असेच मोडकळीस आलेले पथदिवे सध्याच्या घडीला याठिकाणी मृत्यूचे सापळे बनले आहेत. मात्र याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.

एमएसआरडीसीच्या माध्यमातुन या मार्गावर टोल वसुली देखील सुरु आहे. मात्र तरी देखील याठिकाणी दुर्लक्ष केले जात आहे. सध्याच्या घडीला सायन पनवेल महामार्गावर बेलपाडा बस थांब्याजवळ, कोपरा गावाजवळील हायवे ब्रेक हॉटेल समोरील रस्त्याच्या दुभाजकावरील पथदिवे मोडकळीस आले असुन कोणत्याही क्षणी याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या वादळी पावसाने सायन पनवेल महामार्गवरील धोकादायक पथदिवे जोरदार वार्‍याने रस्त्यावर उन्मळून पडून देखील अद्यापही प्रशासनाचे यांच्या मार्फत संबंधित धोकादायक पथदिवे हटविण्यास सतर्कता दाखविली जात नाही. धोकादायक अवस्थेत उभे असलेले हे पथदिवे कोणत्याही क्षणी उन्मळून कोसळु शकतात.

यासंदर्भात खारघर वाहतुक शाखेच्या माध्यमातून देखील एमएसआरडीसी, सिडको तसेच पालिका प्रशासनाला संबंधित धोकादायक पथदिव्याबद्दल माहिती देण्यात आली असल्याचे खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण यांनी सांगितले. संबंधित नोंद स्टेशन डायरी मध्ये देखील करण्यात आली असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

सायन पनवेल महामार्गावर एमएसआरडीसीच्या माध्यमातून टोल वसुली केली जात आहे. याकरिता खाजगी कंत्राटदार नेमून याठिकाणाहून अवजड वाहनांकडून टोल देखील वसुल केले जात आहे. याव्यतिरिक्त सिडको प्रशासन देखील याठिकाणी कार्यरत असल्याने प्रशासनांच्या समन्वयाच्या अभावामुळे या मार्गावर सध्याच्या घडीला मृत्यूचे सापळे निर्माण झाले आहेत.

त्वरित दुरुस्त करण्याची मागणी

सायन-पनवेल महामार्गावरील मोडकळीस आलेले पथदिवे पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जबाबदार प्राधिकरणाच्या माध्यमातुन यासंदर्भात त्वरित धोकादायक पथदिव्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply