Breaking News

दार उघड उद्धवाऽऽ, दार उघड..!

धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी घंटानाद

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील धार्मिक स्थळे व मंदिरे सुरू करण्यासाठी राज्यभरातील धार्मिक संघटना एकवटल्या आहेत. या धार्मिक संघटनांनी शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरू करा, या मागणीसाठी राज्यभर दार उघड उद्धवा, दार उघड, अशी हाक देत विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला भाजपचा पूर्ण पाठिंबा असून भाजपही आंदोलनात सहभागी होणार असल्याने मंदिरे सुरू करण्यासाठी ठाकरे सरकारवरील दबाव वाढला आहे.
महाराष्ट्रातील विविध धार्मिक संस्था व प्रमुख देवस्थानांच्या वतीने शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. अध्यात्मिक समन्वय आघाडीने या आंदोलनाची हाक दिली. भाजपचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे. तसेच आंदोलनात सहभागी होताना फेस मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करावे, अशी सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केली आहे.
केंद्राने देवस्थाने सुरू करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले. देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरूही करण्यात आली. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरू करण्याची अनेक व्यक्ती, संघटनांनी राज्य सरकारकडे मागणी केली.  नियम पाळून देवस्थाने सुरू करावी, अशी मागणी असतानाही राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करीत नाही. त्या पार्श्वभूमीवर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. प्रमुख देवस्थानांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. त्याचाही सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज आहे, असेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी राज्यातील विविध धार्मिक संस्था व प्रमुख देवस्थानांच्या समित्यांच्या प्रमुखांची अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पुढाकाराने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीला साई संस्थानचे सुरेश हावरे, देवस्थान समितीचे महेश जाधव, विठ्ठल-रुखमिनी मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी अध्यक्ष अतुल भोसले, श्री सिद्धीविनायक मंदिर समितीचे विश्वस्त सुमंत घैसास आदी उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply