अलिबाग : प्रतिनिधी
पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर लाडका बाप्पा तसेच गौरीमातेला भाविकांकडून गुरुवारी (दि. 27) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम व अटींचे पालन करून पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत विसर्जन करण्यात आले.ज्याच्या आगमनाची भाविक आतुरतेने वाट पाहत होते त्या सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाचे शनिवारी घरोघरी आगमन झाले. अत्यंत श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावाने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर गौरीमातेचे आगमन झाले. तिचीही विधीवत पूजाअर्चा केली गेली. गोडाधोडाचा नैवेद्य दाखविण्यात आला. गणपती व गौरीची मनोभावे सेवा केल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी त्यांना जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. कोरोनाचे संकट दूर कर, असे साकडे या वेळी सर्वांनी घातले. कोरोनामुळे शासनाने मिरवणुका काढण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे या वर्षी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका पाहायला मिळाल्या नाहीत. सर्वत्र साधेपणाने विसर्जन झाले. दुपारी 4 वाजल्यापासून गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आल्या. कुठेही ढोल-ताशांचा गजर नाही, गुलालाची उधळण नाही की मिरवणुका नाहीत. अतिशय शांततेत विसर्जन सोहळा झाला. रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात 84 सार्वजनिक, 54 हजार 512 घरगुती गणपती तसेच 14 हजार 423 गौरींचे विसर्जन करण्यात आले. अलिबाग, उरण, मांडवा, आक्षी, मुरूड, रेवदंडा, श्रीवर्धन येथे समुद्रकिनारी गणेश विसर्जन करण्यात आले, तर अन्य भागांमध्ये समुद्र, नद्या, तलाव, ओढ्यांमध्ये विसर्जन झाले. विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्थानिक स्वराज्य संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांनी आपल्या बाप्पांचे विसर्जन आम्ही करू असा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यासाठी विसर्जनस्थळी तयारी करण्यात आली होती. विसर्जनासाठी आलेल्या भक्तांकडून तेथेच गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या. कर्मचारी, स्वयंसेवक तसेच जीवरक्षकांच्या मदतीने या मूर्तींचे विधीवत विसर्जन करण्यात आले. या वेळी भाविकांचे डोळे पाणावले होते.
बा गणेशा, कोरोनारूपी विघ्न दूर कर! यंदा सर्व सण-उत्सवांवर कोरोनाचे संकट आहे. गणेशोत्सवदेखील त्याला अपवाद ठरला नाही. दरवर्षी दणक्यात साजरा होणारा हा उत्सव या वर्षी साधेपणाने साजरा होत असल्याचे दिसून आले. असे असले तरी तो साजरा करण्यामागचा भक्तिभाव व भावना कायम आहे. पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होताना कोरोनारूपी विघ्न दूर कर, अशी प्रार्थना भक्तांनी विघ्नहर्त्याकडे केली.