Breaking News

शेकडो शाळा दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

निसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान; जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव

रोहे ः प्रतिनिधी

कोकणातील रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले होते. वादळात अनेक घरांवरील छपरे उडून महाकाय झाडे पडली. त्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतीचीही हानी झाली होती. याबरोबरच सरकारी इमारतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान जिल्हा परिषदेच्या शाळांचे झाले आहे. रोहा तालुक्यात 198 शाळांचे नुकसान झाले असून यापैकी अद्याप 171 शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरोनाचे संकट, निसर्ग चक्रीवादळ यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक घरांची तसेच सरकारी इमारतींची पडझड झाली. यामध्ये सर्वाधिक शाळेच्या इमारतींची पडझड झाली. शाळेवरून छप्पर उडाले तसेच काही ठिकाणी भिंती पडल्या आहेत. या शाळा आता दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. रोहा तालुक्यात 237 शाळा असून यापैकी 198 शाळांचे निसर्ग चक्रीवादळात नुकसान झाले आहे. यामध्ये 27 शाळांचे स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत स्तरावर दुरुस्तीचे काम करण्यात आले. यातील उर्वरित 171 शाळांचे मोठे नुकसान झाले असून या शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

शाळांच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटी 90 लाख 68 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. या काळात शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता शाळा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर चालू आहेत. शक्यतो दिवाळीनंतर शाळा सुरू होतील, असा अंदाज आहे. त्यानुसार दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यास त्यापूर्वीच रोहा तालुक्यातील पडझड झालेल्या शाळांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पडझड झालेल्या शाळेत विद्यार्थी कसे बसणार, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे रोहा तालुक्यातील पडझड झालेल्या शाळांची लवकरात लवकर दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply