Breaking News

महाआघाडीची धडधड

फडणवीस-राऊत यांच्या भेटीमुळे या दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा काही वेगळा डाव शिजत नाही ना, या भीतीने महाविकास आघाडीच्या तंबूत घबराट उडाली. दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चेचे गुर्‍हाळ सुरू झाले. इतकेच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धाव घेतली. महाविकास आघाडीत सारे काही आलबेल आहे ना, याची खातरजमा करून घेण्यासाठी बैठकांवर बैठकांचे सत्र सुरू झाले. अजूनही महाविकास आघाडीतील पक्षांच्या मनातील संशय पुरता मिटलेला नाही.

गेले काही महिने कशीबशी सत्ता टिकवून गुजराण करणारे महाविकास आघाडीचे सरकार कधी कोसळेल हे कोणालाच सांगता येणार नाही, परंतु जितके दिवस या सरकारने सत्तेमध्ये काढले ते अवघे दिवस त्यांच्या काळजातली धडधड वाढवणारेच होते. याचे प्रमुख कारण म्हणजे जोरजबरदस्तीने सत्तेत आलेली ही तीन चाकी महाविकास आघाडी मुळातच वैचारिक साधर्म्य नसलेल्या पक्षांची अनैसर्गिक युती आहे. अशा प्रकारच्या सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकेकाळी ‘महामिलावटी सरकार’ असे वर्णन केले होते. तशाच प्रकारची भेसळ महाराष्ट्रातील मतदारांच्या नशिबी आली. हे सरकार पाडण्यासाठी कोणालाही प्रयत्न करावे लागणार नाहीत. तसे प्रयत्न करण्याची गरज देखील नाही. आपसातील अंतर्विरोधामुळे हे सरकार लवकरच कोसळेल हे सांगण्यासाठी कुणा भविष्यवेत्त्याची गरजही नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या अन्य अनेक नेत्यांनी वारंवार हीच भावना व्यक्त केली आहे. परंतु सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजपसारखा पक्ष सातत्याने करत असल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीकडून वारंवार केला जातो. अर्थात, त्यात काहीही तथ्य नाही. किंबहुना, एका विशिष्ट भयगंडामधूनच अशा प्रकारचे आरोप केले जातात. दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मुंबईच्या उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलात भोजनभेट घेतली. तब्बल दोन तास ही भेट झाली. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेना आणि भाजप हे आता एकमेकांपासून बरेच दूर झाले आहेत. अडीच-तीन दशकांची मैत्री आता उरलेली नाही. एकेकाळी एकमेकांच्या साथीने हिंदुत्वाचे राजकारण करणारे हे मित्रपक्ष आता खूपच दुरावले आहेत. वास्तविक फडणवीस व राऊत यांच्यामध्ये झालेली भेट अगदीच फुटकळ व अराजकीय स्वरुपाची होती. खासदार राऊत यांना फडणवीस यांची दीर्घ मुलाखत घेण्याची इच्छा आहे. परंतु तशी मुलाखत देण्यापूर्वी फडणवीस यांनी काही अटी घातल्या आहेत. या मुलाखतीच्या वेळी आपलाही कॅमेरा असेल आणि ही मुलाखत विनासंपादित प्रक्षेपित करण्यात यावी असा फडणवीस यांचा आग्रह होता व आहे. ज्या पक्षाने बंद खोलीतील तथाकथित संवादाचे खोटे भांडवल करून जुनी मैत्री तोडण्यापर्यंत मजल मारली, त्या पक्षाच्या पुढार्‍याला मुलाखत देताना एवढी काळजी तर घ्यायला हवीच. त्यामुळे या प्रस्तावित मुलाखतीची रूपरेषा ठरवण्यासाठी फडणवीस यांनी मुलाखतकाराशी प्रदीर्घ चर्चा केली. परंतु एवढ्याशा गोष्टीमुळे सत्तेतील महाविकास आघाडीच्या काळजातील धडधड किती वाढली ते आपण पाहिलेच. यावरूनच हे सरकार किती तकलादू आहे हे सिद्ध होते. असे सरकार किती काळ टिकणार हा प्रश्न कुठल्याही सामान्य मतदाराला पडल्याशिवाय राहणार नाही.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply