पेणमधील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये
पेण : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून ते कोणीही कोणत्या जाती-धर्माचा असो वा कोणत्या प्रातांचा असो विकास हीच परिभाषा समोर ठेवून काम करीत आहेत. पक्षाची वाटचालही त्या दृष्टीनेच सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 30) येथे केले.
पेण पूर्व विभागातील महामिर्या ग्रामपंचायत हद्दीतील चांदेपट्टी, बंगालवाडी, भोंगोळी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. शेकापमधून भाजपमध्ये तुम्ही जो प्रवेश केला आहे तो विश्वास सार्थकी लावण्याचे काम आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू, अशी ग्वाही त्यांनी प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांना दिली.
या कार्यक्रमास आमदार रविशेठ पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, चिटणीस मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रविकांत म्हात्रे आदी उपस्थित होते.
पक्षप्रवेशकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही विकासापासून वंचित राहिलेले आहात. यामागे अनेक कारणे असतील. अनेक वर्षे आपण शेतकरी कामगार पक्षाची एकच विचारधारा धरून ठेवली, मात्र ही विचारधारा उत्कर्षासाठी कधीच उपयोगी पडली नाही. त्यामुळे तुम्ही परिवर्तनाचा निर्णय घेत भारतीय जनता पक्षाच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल तुमचे स्वागत. पेण तालुक्यात आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून विकासाची गंगा सातत्याने वाहत आहे. आजपर्यंत जो दुरावा होता तो दुरावा कमी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पाऊल पुढे टाकले आहे. आपल्या ज्या समस्या असतील त्या येणार्या काळात सोडविण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू.
माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत आदिवासी पाड्यांवर डांबरी रस्ते करण्याचे काम केले असून, आजही येथील जनता मला धन्यवाद देत आहे. आपण मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला याचा नक्कीच फायदा होणार असून, आपल्या भागाचा विकास होईल, असे अभिवचन आमदार रविशेठ पाटील यांनी दिले.
जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे गोरगरीब आदिवासी जनतेची फसवणूक करण्याचे काम शेकापने केले, परंतु आपण आज जो निणर्य घेतला यातून आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून तळागाळातील माणसाला न्याय देण्याचे काम होणार आहे. जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील यांनीही पेण तालुक्यात विकासाचा ओघ आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून होत असून, येथील जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार पाटील यांनी नेहमी आग्रही भूमिका घेतली आहे, असे सांगितले.
या वेळी पेण पूर्व विभागातील राजेश मोरे, मारुती नौघणे, हिरामण जेधे, जयराम नौघणे, रवी जेधे, गणेश दळवी, भास्कर झोरे, गणेश भिकावले, अमित नौघणे, शंकर भिकावले, मीनल जेधे, राजश्री भिकावले, उर्मिला भिकावले, लक्ष्मी फाटक, वसंत झोरे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.
रायगडात शेकापची अवस्था बिकट -आ. रविशेठ पाटील
रायगड जिल्ह्यात खर्या अर्थाने शेकापला घरघर लावण्याचे काम पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले असून, मोठ्या मताधिक्क्याने ते निवडून आले. रायगड जिल्ह्यात शेकापची अवस्था आता बिकट झाली आहे. शेकापने गेली अनेक वर्षे पेण पूर्व विभागातील जनतेला वेठीस धरण्याचे काम केले. आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती त्यांच्याकडे असूनसुद्धा या भागातील लोकांना विकासापासून वंचित ठेवण्याचे काम त्यांनी केले, असा आरोप आमदार रविशेठ पाटील यांनी आपल्या भाषणातून केला.