Breaking News

सर्वांपर्यंत लस पोहचवणार!

पंतप्रधान मोदींचे उद्दीष्ट; कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्र्यांसोबत संवाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 24) देशातील काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत कोरोना लस पोहोचविण्या चे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या या बैठकीला महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, दिल्लीचे मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाच्या वर्तमान स्थितीची माहिती तसेच कोरोना लस वितरणासंदर्भातील तयारीबाबत पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
या वेळी पंतप्रधान मोदींनी देशातील काही भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची दखल घेतानाच भारत चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यूदर या बाबतीत भारत दुसर्‍या देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीमध्ये आहे. हे सर्व एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाल्याचे ते म्हणाले.
कोरोनावरील लस कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना पंतप्रधान मोदींनी लसीबाबत महत्त्वाचे विधान केले. भारत जी कुठली लस आपल्या नागरिकांना देईल, ती वैज्ञानिक दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित असली पाहिजे. कारण वेगाइतकीच सुरक्षिततासुद्धा महत्त्वाची आहे. राज्यांबरोबर समन्वय साधून लस वितरणाची रणनिती ठरवली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी आणि मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे पंतप्रधान मोदींनी या वेळी मुख्यमंत्र्यांना सूचित केले.
सिरम इन्स्टिट्यूटलाभेट देणार?
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येऊन सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरील लस तयार केली जात आहे. या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून, विभागीय आयुक्त कार्यालयात एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत या दौर्‍यात इतर काही देशांचे राजदूतही सहभागी होण्याची सूत्रांची माहिती आहे.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply