महिला व मुलींसाठी खास 12 नवीन योजना
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेने महिला सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल उचलले असून, महिला व मुलींसाठी खास 12 नवीन योजनांना शुक्रवारी (दि. 18) झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. त्यामुळे महिला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असा विश्वास महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांनी व्यक्त केला. दरम्यान, सिडको हद्दीतील नगरसेवकांना आपला निधी खर्च करण्यास परवानगी मिळणार असल्याची माहिती आजच्या महासभेत मिळाल्याने सिडको हद्दीतील नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.
पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी ऑनलाइन झाली. या सभेला सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती, आयुक्त सुधाकर देशमुख उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला स्वच्छता अभियानात चांगले काम करणार्या महापालिका कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.
सिडको हद्दीतील नगरसेवकांना आपला निधी खर्च करण्यास मिळणार असल्याची माहिती प्रश्नोत्तराच्या वेळी आयुक्तांनी दिली. त्यामुळे सिडको हद्दीतील नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले. अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण निष्कासन करण्यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याबाबतच्या आयुक्तांच्या ठरवावरही या वेळी चर्चा करण्यात आली. फेरीवाला धोरण नसल्याने फेरीवाल्यांकडून वसूल करण्यात येणार्या दंडाबाबत समिती नेमण्याची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केलेली सूचना स्वीकारण्यात आली. या वेळी सदस्यांनी सफाई कामगार पिंट्या आणि महापालिका कर्मचारी दौलत शिंदे व्यापार्यांना फसवून पैसे घेत असल्याचा आरोप केल्याने त्याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले. एमएमआरडीच्या माध्यमातून रोहिंजण येथील विकासकामांना मान्यता दिल्याने त्या भागाचा विकास होणार आहे
माजी उपमहापौर चारुशीला घरत यांनी प्रभाग 20मधील डम्पिंग ग्राऊंडबाबत लक्षवेधी मांडली होती. आपल्या प्रभागातील लोकांना दुर्गंधीमुळे जेवण जात नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर चर्चा करताना नगरसेवक तेजस कांडपिळे आणि अजय बहिरा यांनी तेथील दुर्गंधीचा कसा त्रास होतो याची माहिती देऊन 1 जानेवारीपर्यंत स्टेशनजवळचे डम्पिंग ग्राऊंड बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी त्या ठिकाणी कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी येथून कचरा आणून पुन्हा क्षेपण भूमीत नेल्यामुळे महापालिकेचा खर्च कसा वाढत आहे याकडे लक्ष वेधले. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ही समस्या सोडवण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि इंदौर महापालिकेचा दौरा करून पाहणी करण्याचा प्रस्ताव दिला. महापालिका हद्दीत कंपनीकडून मिळणार्या सीएसआर फंडाबाबत धोरण निश्चित करून खर्च करण्याचे ठरले.
या आहेत योजना
महिला व बालकल्याण समितीने महापालिका हद्दीतील महिला, मुली व शालेय विद्यार्थी यांना लाभ देण्यासाठी 12 योजना सभागृहासमोर ठेवल्या. त्याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवकांनी महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांचे आभार मानून त्याला मंजुरी दिली.
- प्रभागनिहाय मुलींना व महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देणे. 2. महापालिका शाळेतील पाचवी व सहावीतील मुलींना आणि महापालिका महिला कर्मचार्यांना गर्भाशयमुखाची कॅन्सर लस देणे 3. महापालिका क्षेत्रातील टॉयलेट उभारणे. 4. वैद्यकीय शिक्षण घेणार्या मुलींना प्रोत्साहन शिष्यवृत्ती देणे. 5. राज्य व राष्ट्रीय स्तरावार क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवणार्या मुलांना आर्थिक मदत करणे. 6. शाळेतील 14 वर्षांपर्यंतच्या मुली व मुलांसाठी समुपदेशन कार्यक्रम करणे. 7. आदिवासी वाड्यातील कुपोषित मुलांकरिता उपाययोजना करणे. 8. महिलांसाठी समुपदेशन केंद्र व कायदेविषयक सल्ला केंद्र चालविणे. 9. महिलांकरिता उद्योग उभारणेकामी उद्योजिकता विकास प्रशिक्षण देणे. 10. गल्लीच्छ वस्त्यांमध्ये स्वच्छता व महिलांचे आरोग्याबाबत समुपदेशन करणे. 11. अनाथ/निराश्रित मुलांना दत्तक घेतलेल्या पालकांसाठी प्रोत्साहन अनुदान योजना राबविणे. 12. महिलांच्या विकासाकरिता विविध उपक्रम राबविणे.