Breaking News

नवा कोरोना विषाणू  :केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार यूकेहून येणार्‍या प्रवाशांपैकी नव्या कोरोना स्ट्रेनसहीत संक्रमित आढळलेल्या रुग्णांना वेगळ्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. याशिवाय कोरोना संक्रमित आढळलेल्या सह-प्रवाशांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल. सरकारने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता ब्रिटनहून येणार्‍या विमानांसाठी नवी मार्गदर्शक प्रणाली (एसओपी) जाहीर केली आहे. नवा व्हायरस हा जास्त पसरणारा असला तरी तो जीवघेणा नाही तसेच त्याच्या संदर्भात आणखी स्पष्टपणे कळालेले नाही, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

  • ब्रिटनहून येणार्‍या सर्व प्रवाशांना विमानतळावरच आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. त्यांची सॅब स्टेस्ट घेऊन ते नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात येणार असून, व्हायरसमध्ये काही बदल झाला आहे का याची तपासणी केली जाणार आहे.
  • कोरोना संक्रमित आढळलेल्या व्यक्तीमध्ये नवा विषाणू न आढळल्यास त्याच्यावर सध्याच्या सुरू असलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करण्यात येतील, परंतु नवा विषाणू आढळल्यास त्या रुग्णावर उपचार सध्याच्या प्रोटोकॉलनुसार झाल्यानंतर 14 दिवसानंतर पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येईल. 14व्या दिवशीही तो पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्या चाचण्या तोपर्यंत सुरू राहतील जेव्हापर्यंत सलग दोन वेळा त्याच्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह येणार नाही.
  • आरटी-पीसीआर चाचणीत निगेटिव्ह आढळणार्‍या प्रवाशांना घरी क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला जाईल. विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानात बसण्याआधीच या नियमांची माहिती दिली पाहिजे. त्यानंतर विमानातही त्याबाबत सूचना दिले पाहिजे. त्याचबरोबर विमानतळावर त्याबाबत स्पष्ट बोर्ड लावणे गरजेचे आहे.
  • चेक इन करण्यापूर्वीच या सगळ्या गाइडलाइन्स प्रवाशांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी विमान कंपनीची असेल. उड्डाणादरम्यान याची अनाऊन्समेंट केली जाईल. आगमन-प्रतीक्षा भागात ही मार्गदर्शक तत्त्वे चिकटवली जातील.
  • पॉझिटिव्ह प्रवाशांच्या मागे आणि पुढे तीन रांगेत बसलेल्या प्रवाशांना संक्रमणाचा धोका असल्याने त्यांना आयसोलेट करण्यात येणार आहे. अशा प्रवाशांची माहिती त्यांना कळवावी लागणार आहे.
  • खबरदारीचा उपाय म्हणून नोव्हेंबरपासून ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची माहिती प्रशासन गोळा करीत असून, त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली जाणार आहे.
    राज्य शासनही सतर्क
    मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला असून, या दुसर्‍या प्रकारच्या विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, पुढचा धोका लक्षात घेऊन जागरूक राहावे, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 22) सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोरोना स्थिती, करोना विषाणूचा दुसरा प्रकार व त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदीबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply