Breaking News

वार्षिक आराखड्याचा निधी रायगड जिल्हा प्रशासनाकडे वर्ग

निधी वेळेत खर्च करण्याचे आव्हान

अलिबाग : प्रतिनिधी
कोरोनामुळे जिल्हा वार्षिक विकास आराखड्यातील निधीला कात्री लावण्यात आली होती. शासनाने रायगड जिल्हा वार्षिक आराखड्याचा 234 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. हा निधी मार्च 2021पर्यंत खर्च होऊ शकला नाही तर विकासकामांसाठी आलेला निधी समर्पित करावा लागण्याची शक्यता आहे.  त्यामुळे हा निधी वेळेत खर्च करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासकीय यंत्रणेसमोर आहे.
रायगड जिल्ह्यासाठी 2020-21 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने 234 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली होती, मात्र कोरोनामुळे  राज्याच्या वित्त व नियोजन विभागाने सर्व जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांमधील 67 टक्के रक्कम कमी केली. त्यामुळे रायगडचा 234 कोटी रुपयांचा विकास आराखडा थेट 77 कोटींवर आला. यातील 19 कोटी रुपये हे आरोग्यविषयक कामांसाठी खर्च करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यामुळे अनेक विकासकामे रखडली.
आता शासनाने सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेत मंजूर निधी पुन्हा उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय आमदार स्थानिक विकास कार्यक्रम आणि डोंगरी विकास निधीही उपलब्ध करून दिला आहे. शासनाच्या वित्त व नियोजन विभागाने जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर 234 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली विकासकामे पुन्हा सुरू करता येणार आहे.
कोविडमुळे केवळ मदत पुनर्वसन, अन्न नागरी पुरवठा, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन आणि वन विभागातील अत्यावश्यक कामांसाठी निधी खर्च करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले होते. आता निधी उपलब्ध झाल्याने इतर विकासकामेदेखील करता येणार आहेत.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस वार्षिक विकास आखड्यातील मंजूर निधी जिल्हा नियोजन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. आता हा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला धावपळ करावी लागेल. हा निधी वेळेत खर्च होऊ शकला नाही तर विकासकामांसाठी आलेला निधी समर्पित करावा लागण्याची शक्यता आहे.

वित्त व नियोजन विभागाकडून 239 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार विकासकामांचे नियोजन सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत.
-जे. डी. मेहेत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी, रायगड

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply