Breaking News

जगाच्या नेतृत्वाची मोदींमध्ये क्षमता

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

पाली : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ आपल्या देशाचे नव्हे; तर संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले सक्षम नेते असल्याचे खणखणीत प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे काढले. ते महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद बैठकीत बोलत होते.

रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार ना. अनंत गीते यांच्या प्रचारार्थ भाजप बुथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख, पदाधिकारी यांची संवाद बैठक शुक्रवारी (दि. 5) पाली येथील भक्तनिवास क्र. 2 येथे आयोजित करण्यात आली होती.

या मेळाव्यास सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, एका बाजूला भ्रष्टाचाराने बरबटलेले सुनील तटकरे; तर दुसर्‍या बाजूला निष्कलंक  लोकप्रतिनिधी अनंत गीते निवडणूक रिंगणात आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकार्याने पुनित झालेल्या रायगड जिल्ह्यात चुकीच्या माणसांच्या हातात नेतृत्व जाणार नाही याची दक्षता घ्या. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार अनंत गीतेंना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत या जाणिवेतून जोमाने काम करा.

ना. चव्हाण यांनी आपल्या विस्तृत भाषणात देशद्रोह्यांवरील खटले रोखण्यासाठी पुढाकार घेणार्‍या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरदेखील टीका केली. ते पुढे म्हणाले की, युती सरकारच्या लोकाभिमुख व जनकल्याणकारी योजनांची माहिती तळागळातील जनतेपर्यंत पोहोचवा. यश आपलेच आहे. ना. अनंत गीते यांच्या विजयाची मोठी गुढी येत्या 23 तारखेला उभारूया.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकाप व राष्ट्रवादी या आघाडीतील पक्षांवर तोफ डागली.

मागील 2014च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या रूपाने लढतीत असलेला भ्रष्टाचाराचा अजगर निपचित पाडण्याचे काम जनतेने केले. आता पुन्हा सर्वांच्या ताकदीने तटकरे यांना पराभूत करण्याची कामगिरी करून अनंत गीते यांना मोठ्या मताधिक्क्याने सातव्यांदा निवडून देत कोकणच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दिल्लीत पाठवूया, असे आवाहन आमदार ठाकूर यांनी केले. मावळ मतदारसंघात अजित पवारांचे चिरंजीव पार्थ निवडणूक लढवित असून, येत्या 29 तारखेला पार्थ यांचे पार्सल पुन्हा बारामतीला पाठवून देऊ, असेही ते म्हणाले.

शेकापचा समाचार घेताना आमदार ठाकूर यांनी, आजवर तत्त्वाच्या गोष्टी करणार्‍या शेकापने कितीही लांड्यालबाड्या केल्या, तरी जनता या पक्षाला जवळ करणार नसल्याचे सांगितले. शिवसेना व भाजपची युती खुल्या मनाने झाली असल्याने युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती जवळून बघण्याचा योग पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आला. शिवसैनिक असलो तरी विश्व हिंदू परिषेदचा कट्टर कार्यकर्ता असून, शिवसेना व भाजप या पक्षांची युती म्हणजे जनतेच्या मनातील मनोमीलन आहे. राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध लोकाभिमुख योजना व विकासकामे झाली आहेत. पेण-सुधागड मतदारसंघात शेकाप व राष्ट्रवादीला औषधालाही मतदान होणार नाही, असे जैन म्हणाले.

भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत यांनी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना सुधागड तालुक्यातून प्रचंड मताधिक्य मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली; तर विष्णू पाटील यांनीदेखील जोशपूर्ण भाषणात  अनंत गीते यांना निवडून आणण्यासाठी महायुती सज्ज झाली असल्याचे सांगितले.

या मेळाव्यास भाजप जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप, सरचिटणीस विष्णू पाटील, सुनील दांडेकर, चिटणीस राजेश मपारा, बंडू खंडागळे, उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संजय कोणकर, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र गांधी, चंद्रकांत घोसाळकर, निखिल शहा, आनंद लाड आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकदिलाने काम करा : आमदार प्रशांत ठाकूर

या वेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, नरेंद्र मोदींना पुन्हा या देशाचे पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने व एकजुटीने काम करावे. पालकमंत्र्यांचे सुधागड तालुक्यावर विशेष प्रेम असल्याने येथे स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे एकतर्फी न राहता आपणही मतांच्या माध्यमातून हे प्रेम अधिक दृढ करावे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply