Breaking News

अनुभवी इशांत की युवा सिराज? इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ व्यवस्थापनापुढे पेच

चेन्नई : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत असंख्य आव्हानांना सामोरे जात दमदार कामगिरी करणारा युवा मोहम्मद सिराज आणि दुखापतीतून सावरत पुनरागमन करणारा अनुभवी इशांत शर्मा यांच्यापैकी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून कुणाला संधी द्यावी, असा पेच भारतीय संघ व्यवस्थापनापुढे निर्माण झाला आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवार (दि. 5)पासून चेन्नई येथे प्रारंभ होणार आहे. या कसोटीसाठी जसप्रीत बुमरा भारताच्या गोलंदाजीच्या मार्‍याचे नेतृत्व करणार असल्याने त्याच्यासह दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून सिराज आणि इशांत यांच्यापैकी एकालाच अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळू शकते. ‘चेन्नईची खेळपट्टी परंपरागत भारतातील कसोटी सामन्यांप्रमाणे फिरकीला पोषक ठरणारी आहे. त्यामुळे अशा खेळपट्टीवर तुम्ही तीन वेगवान गोलंदाजांसह उतरण्याची जोखीम पत्करू शकत नाही. बुमराचे पहिला वेगवान गोलंदाज म्हणून संघातील स्थान पक्के असल्यामुळे संघ व्यवस्थापन सध्या सिराज आणि इशांतच्या तंदुरुस्तीबरोबरच सरावावरही बारीक लक्ष ठेवत आहे,’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले. या कसोटीत भारत तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाज असे एकूण पाच गोलंदाजांसह खेळण्याची दाट शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात पितृशोकाला सामोरे जाणार्‍या 26 वर्षीय सिराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटींत खेळताना भारतासाठी सर्वाधिक 13 बळी मिळवले. यादरम्यान त्याच्यावर वर्णद्वेषी टिप्पणीही करण्यात आली, परंतु सिराजने कामगिरीच्या बळावर संघाच्या मालिका विजयात मोलाची भूमिका बजावल्याने तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. दुसरीकडे 32 वर्षीय इशांत स्नायूंच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने दिल्लीचे प्रतिनिधित्वदेखील केले. त्यामुळे पहिल्या दोन कसोटीसाठी इशांतचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत इशांतची कामगिरी मोठया प्रमाणावर सुधारली असून, एका टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी करण्याबरोबरच संघाचा अनुभवी गोलंदाज म्हणून त्याने नावलौकिक मिळवला आहे. मोहम्मद शमी अद्यापही जायबंदी असल्याने आता कर्णधार विराट कोहली इशांत आणि सिराज यांपैकी पहिल्या कसोटीसाठी कोणाची दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून निवड करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Check Also

सुकापूरमध्ये सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त सुकापूर ग्रामस्थ मंडळ आणि सुकापूर प्रीमियर लीगच्या वतीने सरपंच चषक 2024 …

Leave a Reply