Breaking News

रायगड जिल्ह्यात जमावबंदी लागू

अलिबाग : प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढीस लागला असून, रायगड जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाविषयक नियमांचे उल्लघन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
जिल्ह्याधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना महापालिका आणि नगर परिषदांना देण्यात आल्या आहेत. हॉटेल व्यावसायिकांकडून कोरोनासंबंधी नियमांचे पालन होत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे. दुकानांमध्ये मुखपट्टी, आंतरविषयक नियमांचे पालन होत आहे अथवा नाही याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बसस्थानक, सार्वजनिक शौचालये आणि पर्यटनस्थळांवर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मुखपट्ट्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
याशिवाय लग्न समारंभावर प्रशासनाची नजर असणार आहे. 50पेक्षा अधिक व्यक्तींच्या सहभागावर निर्बंध घालण्यात आले आहे. नियमांचे उल्लघन करणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकूणच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक निर्णय घेतले असून, नियम मोडणार्‍यांविरोधात कारवाई केली जाणार आहे.
पोलीसही अ‍ॅक्शन मोडमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यात जमावबंदी
आदेश लागू केले आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचे उल्लघन करणार्‍यांवर पोलिसांकडूनही कारवाई केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी आणि चार कर्मचारी अशी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या समवेत पोलिसांचे हे पथक नियम मोडणार्‍यांवर कारवाई करणार आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply