लाखो रुपये घेत मतदार वाढवले असल्याचा भाजपचा आरोप
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
येथील महानगरपालिका निवडणूक येत्या दोन महिन्यांत लागण्याची शक्यता असल्याने सध्या मनपा प्रशासनाकडून मतदारयाद्या बनविण्याचे काम शेवटच्या टप्यात आले आहे. येत्या आठवड्यातभरात अंतिम मतदान यादी घोषित होणार तोच भाजपने मतदारयादीत 90 हजार बोगस नावे टाकण्यात आल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे यासाठी अधिकारीवर्गाने लाखो रुपये घेतले असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी केला आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने मतदान याद्यांची अंतिम प्रत बनविण्याच्या आगोदर सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. यानुसार 3698 हरकती मनपा प्रशासनाकडे विविध पक्षांनी, नगरसेवकांनी लेखी स्वरूपात दिल्या आहेत. याबाबत योग्य ते पुरावे तपासून, मतदारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष मतदार संबंधित पत्त्यावर राहतात का? याची खातरजमा करूनच त्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट किंवा बाद करण्यात येणार आहेत.
भाजप आमदार गणेश यांनीही मतदारयाद्यांवरून शंका उपस्थित केली आहे. मतदारयाद्या बनविताना महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन मनपा अधिकारी मतदारयाद्यांमध्ये बोगस नावे टाकत आहेत. यासाठी एक हजार रुपये एका मताला याप्रमाणे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून मतदारयांद्यामध्ये चुकीची नावे घातली असल्याचा आरोप केला आहे.
मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे लेखी मागणी करीत संबंधीत अधिकार्यांवर कारवाई करून मतदारयाद्या तपासाव्यात, अशी मागणी भाजपने केली आहे.