पनवेल : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी आपला अर्ज दाखल केल्यानंतर, दुसर्या दिवसापासून त्यांचा प्रचार पनवेल तालुक्यात घरोघरी सुरू झाला. यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे रणरणत्या उन्हाची पर्वा न करता कार्यकर्ते गाव, शहर, वाडी, वस्ती, वसाहती पालथ्या घालत आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्जप्रक्रिया झाली. महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला अर्ज निगडी येथे दाखल केला. त्यानंतर प्रचार खर्या अर्थाने रंगू लागला आहे. बुधवारी महायुतीच्या वतीने गावोगावी फिरून प्रचार करण्यात आला. यामध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती.
न्हावे, न्हावेखाडी येथे घरोघरी जाऊन महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रचार रॅलीमध्ये पं. स. सदस्या तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता म्हात्रे, सदस्य विजय घरत, योगिता भगत, कामिनी कोळी, जयश्री कोळी, स्नेहलता ठाकूर, मंजुषा ठाकूर, प्रतिभा भोईर, विजय ठाकूर, अरुण ठाकूर, सी. एल. ठाकुर, व्ही. के. ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गव्हाण परिसरातही कार्यकर्त्यांनी प्रचार केला. याशिवाय पनवेल महापालिका प्रभाग 1 आणि कर्नाळा विभागातदेखील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी परिसर पिंजून काढला.