Breaking News

कर्जतमधील रस्त्यांच्या कामांना मुहूर्त मिळेना

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील गावे जोडणार्‍या पाच कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी आठ कोटी रुपयांच्या निविदा नोव्हेंबर 2020 मध्ये मंजूर करण्यात आल्या. दरम्यान, पावसाळा जवळ येऊ लागला तरी रस्त्यांची कामे सुरू होत नसल्याने स्थानिक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्या अनुषंगाने संबंधित योजनेचे काम का सुरू केले जात नाही, याचा जाब राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकारीवर्गाला विचारावा, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 2019-20 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जा उन्नती करण्यासाठी काही रस्त्यांची कामे ग्रामसडक योजनेतून प्रस्तावित करण्यात आली होती. कर्जत तालुक्यातील गावे जोडणार्‍या सहा रस्त्यांची कामे मंजूर झाली होती. त्यापैकी पाच रस्त्यांच्या कामांना आठ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्या राज्यमार्ग 103पासून बोर्ले-जिते-कुंभे या 2.59 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी अडीच कोटी, तर प्रमुख जिल्हा मार्ग चिंचवली-सालवड-नसरापूर या 3.20 किमीच्या रस्त्यासाठी 1.89 लाख, खांडपे-तिवणे-सांडशी या 4.3 किमीच्या रस्त्यासाठी पावणेतीन कोटी रुपये, जिल्हा हद्दीपासून बेडीसगाव या दोन किमीचा जोडरस्ता तयार करण्यासाठी 71 लाख रुपये आणि कोषाणे-वावे या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी साडेतीन कोटी असा आठ कोटी रुपये खर्चाच्या कामांच्या निविदा नोव्हेंबर 2020मध्ये शासनाने ऑनलाइन पद्धतीने काढल्या होत्या. या निविदा 25 नोव्हेंबर रोजी मंजूर केल्यानंतर शासनाने ही सर्व कामे करण्यासाठी 4 जानेवारी 2021 रोजी संबंधित ठेकेदार कंपनीला कार्यादेश देण्यात आले होते.

नवी मुंबई येथील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन कंपनीने कर्जत तालुक्यातील पाच कामांचा ठेका मिळविला आहे, मात्र अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत ठेवणार्‍या सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन कंपनीने कर्जत तालुक्यातील पाचही कामांचे कार्यादेश मिळूनदेखील मागील अडीच महिन्यांत कामे सुरू केली नाहीत. शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर केलेल्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. त्यातील बोर्ले-जिते, सालवड-नसरापूर आणि सांडशी-खांडपे, कोषाणे-वावे या रस्त्यांवरून दुचाकी चालवणेदेखील कठीण होऊन बसले आहे. जानेवारी महिन्यात या रस्त्यावर खडीकरण आणि डांबरीकरणाची कामे सुरू झाली असती, तर मे महिन्यापर्यंत उन्हाळ्यात ही कामे पूर्ण होऊन रस्ता नव्याने तयार झाला असता, मात्र ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांना या वर्षीदेखील खड्ड्यांतून मार्ग काढत जावे लागणार आहे.

कर्जत तालुक्यातील 2019-20च्या आराखड्यातील सहा रस्त्यांच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामासाठी निविदा मंजूर करून कार्यादेश देण्यात आले आहेत. 4 जानेवारी 2021 रोजी कार्यादेश देण्यात आल्यानंतर रस्त्याची कामे सुरू झाली नसल्याने ठेकेदार कंपनीला पत्र पाठवून सूचित करण्यात आले आहे. त्यांनी सर्व कामे सुरू करावीत, असे आदेशदेखील निर्गमित करण्यात आले आहेत.

-दिनेश परदेशी, उपअभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

 मला त्या सर्व कामांबद्दल कोणतीही माहिती नाही.

-पी. पी. बनगोसावी, कार्यकारी अभियंता, रायगड जिल्हा

आमच्या कंपनीला त्या कामांचा ठेका मिळाला आहे. आम्ही लवकरच काम सुरू करणार आहोत.

-ठेकेदार, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन

Check Also

पनवेलजवळील करंजाडे येथे शुद्ध पाण्याचा प्रकल्प

माफक दरात सेवा; नागरिकांची भागणार तहान पनवेल : रामप्रहर वृत्तनांदी व सनोफी फाउंडेशनच्या वतीने पनवेलजवळील …

Leave a Reply