Breaking News

मुरूड पालिकेत सत्ताधारी-विरोधकांचे साटेलोटे

भाजपचे ज्येष्ठ नेते जनार्दन कंधारे यांचा आरोप

मुरूड : प्रतिनिधी

शहरातील बहुतांशी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, नागरिकांना अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, मात्र नगर परिषदेतील विरोधी पक्ष त्याबाबत बोलताना दिसत नाही. अर्थसंकल्पावरदेखील विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मुरूड नगर परिषदेतील विरोधी पक्षांचे सत्ताधारी पक्षाशी साटेलोटे असल्याचे दिसून येते, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते  जनार्दन (अण्णा) कंधारे यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

मुरूड नगर परिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे, तर विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व काँग्रेस  कार्यरत आहेत. नगर परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्याबाबत विरोधी पक्षांनी आपली भूमिका मांडणे अपेक्षित होते, मात्र मागील दोन वर्षांच्या बजेटबद्दल विरोधी पक्षांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याचा अर्थ सत्ताधारी शिवसेना व विरोधी पक्षांचे मिळतेजुळते नाते आहे. नगर परिषदेचा प्रत्येक अर्थसंकल्प विरोधी पक्षाला मंजूर वाटतो, याची कारणे तरी काय आहेत हे विरोधी पक्षाने जाहीर करावे, असे आवाहन अण्णा कंधारे यांनी केले.

 मुरूड नगर परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता आल्यापासून विरोधी पक्षाने जनतेच्या कोणत्याही प्रश्नासाठी आवाज उठविलेला नाही. शहरातील जुनी पेठ, भोगेश्वर पाखाडी व अन्य भागातील रस्त्यांवर खड्डे पडले असूनसुद्धा विरोधी पक्ष काहीच बोलत नाही. नगर परिषद सभेत कोणत्या प्रश्नावर रान उठवले, असा एखादा तरी विषय विरोधकांनी सांगावा. विरोधी पक्ष मूग गिळून बसत असल्याने सत्ताधारी पक्षाला कोणताच अडसर राहिलेला नाही. त्यामुळे मुरूड नगर परिषदेत मिलीजुली भगत सुरू असून, जनतेला मात्र उपेक्षित ठेवले जात आहे, अशी टीका अण्णा कंधारे यांनी या वेळी केली.

शहरातील विविध नागरी समस्यांबाबतही नगर परिषदेतील विरोधी पक्ष नेहमीच थंड असतात. ते कोणत्याही प्रश्नावर आवाज उठवत नाहीत अथवा आपली भूमिका मांडत नाहीत. त्यामुळे त्यांनी सत्ताधारी पक्षाशी आमचे साटेलोटे असल्याचे जाहीर करावे, असे कंधारे म्हणाले.

या वेळी भाजपचे मुरुड तालुका उपाध्यक्ष बाळा भगत, शहर अध्यक्ष उमेश माळी, सुनील खेऊर उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply