Breaking News

राज्यात संपूर्ण लॉकडाऊन?

मंत्री वडेट्टीवार यांचे संकेत; दोन दिवसांत निर्णय

मुंबई ः प्रतिनिधी
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री दोन दिवसांत या संबंधी निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत नुकताच सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला असून, त्याची कशा पद्धतीने अंमलबजावणी होणार आहे याबाबत माहिती घेत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे, मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून राज्य सरकारची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, संचारबंदीचा फायदा सध्या पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही. आपण लॉकडाऊन केलेला नाही. अनेक व्यापार्‍यांचा लॉकडाऊनला विरोध होता, पण आज अनेक जिल्ह्यांमध्ये लोक लॉकडाऊनची मागणी करीत असून आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. दोन दिवसांत कडक लॉकडाऊनसंबंधी निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अंदाज चुकवला. सगळ्यांना वाटत होते लाट सौम्य येईल, पण ही लाट तीव्र निघाली. कोणालाच याची कल्पना नव्हती, असे वडेट्टीवार म्हणाले.
दिल्लीने कडक लॉकडाऊन केला असून त्याची माहिती आम्ही घेत आहोत. तेथील लॉकडाऊन कसा आहे, त्यांची नियमावली काय आहे यावर चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती या वेळी वडेट्टीवार यांनी दिली. दिल्लीच्या लॉकडाऊनचे काय स्वरूप आहे? लोकलसंबंधी काय निर्णय घेतला आहे? अत्यावश्यक सेवांना काय सूट दिली आहे? ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर स्वरूप ठरवून नंतर घोषणा करण्याचा आमचा विचार आहे, असेही त्यांनी सांगितले.
राजधानी दिल्लीत कडक लॉकडाऊन
नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 19 एप्रिल रात्री 10 वाजल्यापासून 26 एप्रिल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू असतील.
दिल्लीत सोमवारी (दि. 19) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 23 हजार 500 रुग्ण आढळले आहेत. राजधानीत औषधांचा तुटवडाही जाणवत आहे. या सर्व गोष्टी पाहता परिस्थिती गंभीर झाल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवील यांनी राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत चर्चा करून सहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभही होईल. लोकांनी लॉकडाऊनचे पालन करावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply