Breaking News

मुंबई इंडियन्स आली धावून

परदेशी खेळाडूंसाठी खासगी चार्टर्ड विमानाची सोय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यावर सर्वांत जास्त समस्या येत आहे ती परदेशी खेळाडूंच्या घरवापसीची. त्याचबरोबर बीसीसीआयला ही परिस्थिती हाताळणे थोडेसे कठीण जात आहे. कारण कमी वेळात त्यांना बर्‍याच गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ हा बीसीसीआयच्या भरवशावर न बसता त्यांनी परदेशी खेळाडूंची खास व्यवस्था केली आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघात बरेच परदेशी खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंना आपल्या मायदेशी पोहचवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने आता स्वत:हून मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आता परदेशी खेळाडूंना आपल्या खासगी चार्टर्ड विमानांमधून मायदेशी सोडणार आहे.

मुंबई इंडियन्स दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये आपले खासगी विमान पाठवणार आहे.

त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघाने या वेळी अन्य संघांच्या मालकांसाठीही मदतीचा हात पुढे केला आहे. अन्य संघांतील कोणत्या परदेशी खेळाडूला मायदेशी सोडायचे असेल, तर त्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ मदत करणार आहे. मुंबईच्या संघात इंग्लंडचा एकही खेळाडू नाही. त्यामुळे ते आपले खासगी विमान इंग्लंडला पाठवणार नाही.

मुंबई इंडियन्सच्या संघात ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम मिल्ने, जेम्स नीशाम आणि शेन बाँड हे न्यूझीलंडचे खेळाडू आहेत. त्याचबरोबर अजून काही संघातील न्यूझीलंडचे खेळाडू मुंबई इंडियन्सच्या खासगी विमानामधून रवाना होणार आहेत. लवकरच मुंबई इंडियन्सची खासगी विमाने रवाना होणार आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांमध्ये परदेशी खेळाडूंना मायदेशात पोहचवण्यात मुंबई इंडियन्सचा संघ यशस्वी ठरू शकणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघात क्विंटन डीकॉक आणि मार्को जेन्सन हे दोन दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आहेत. त्यांना जोहान्सबर्ग येथे पाठवण्याची व्यवस्था मुंबई इंडियन्सच्या संघाने केली आहे. त्याचबरोबर किरॉन पोलार्डला थेट त्रिनिदादमध्ये पाठवण्याची व्यवस्थाही या वेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने केली आहे. अजून काही वेस्ट इंडिजचे खेळाडू या वेळी मुंबई इंडियन्सच्या खासगी विमानाने मायदेशात जाऊ शकतात.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply