Breaking News

चक्रीवादळ अखेर सक्रिय

महाराष्ट्रातही धडकण्याची चिन्हे; यंत्रणा सतर्क

मुंबई : प्रतिनिधी
दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अखेर चक्रीवादळ सक्रिय झाले असून, ते केरळकडून गुजरातच्या दिशेने वर सरकत आहे. या वादळाचा तडाखा महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग ओमानच्या दिशेने होता. त्यामुळे महाराष्ट्र किंवा गुजरातला त्याचा फटका बसणार नसल्याचे म्हटले जात होते, मात्र आता चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळही असेल. परिणामी किनारपट्टीच्या भागात ताशी 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके सज्ज झाली आहेत.
रायगडात वेगवान वारे, अतिवृष्टीचा इशारा
अलिबाग ः चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात 16 व 17 मे रोजी वेगवान वारे वाहून अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे समुद्र किनार्‍यावरील 62 आणि खाडी किनार्‍यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.    
चक्रीवादळामुळे ताशी 60 ते 80 किमी वेगाने वारे वाहणार आहेत, तसेच मुसळधार पाऊस पडणार आहे. वार्‍यामुळे झाडे पडून विजेच्या तारा तुटू शकतात. अतिवृष्टीमुळे काही गावांत पूरस्थितीही उद्भवू शकते. अशा गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तसेच संपूर्ण यंत्रणेलाही सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष निधी चौधरी यांनी दिली.
मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. जनतेने घरातच सुरक्षित राहावे. घर मोडकळीस आले असल्यास सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे. वादळाच्या कालावधीमध्ये किमान तीन दिवस पुरतील इतके खाद्यपदार्थ जवळ ठेवावेत. सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावीत. चक्रीवादळ व अतिवृष्टीचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्रकिनारी व नदीकिनारी राहणार्‍या लोकांनी सावधगिरी बाळगावी. मदत आवश्यक असल्यास  ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालयास संपर्क साधावा, तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी (दूरध्वनी क्रमांक 02141-222097/227452) संपर्क साधावा किंवा 8275152363 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर कळवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
उद्या लसीकरण बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. अशा स्थितीत जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. सध्या 45 वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. चक्रीवादळामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी लसीकरण होणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply